BCCI women Cricketers salary: भारतात महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवून दमदार सुरुवात केली. पण पुढील ३ सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आधी दक्षिण आफ्रिका मग ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंड. या बलाढ्य संघांकडून पराभव झाल्यानंतर भारताचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग कठीण झाला आहे. मायदेशात वर्ल्डकप खेळताना भारतीय संघाची कामगिरी खालावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मानधनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन आहे, मग अशी कामगिरी का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांनी २०२२ मध्ये भारताच्या महिला क्रिकेटपटूंबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला होता. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन दिलं जाणार, अशी घोषणा जय शाह यांनी केली होती. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर कसोटी सामन्यासाठी भारतीय महिला खेळाडूंना १५ लाख रूपये, वनडे सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी -२० सामना खेळण्यासाठी ३ लाख रुपये दिले जातात.
बीसीसीआयकडून महिला क्रिकेटपटूंना समान मानधन दिलं जात आहे. पण कराराच्या बाबतीत पुरुष क्रिकेटपटू पुढेच आहेत. महिला क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआयचा वार्षिक करार हा ३ श्रेणीत विभागला गेला आहे. ज्यात ए, बी आणि सी अशी श्रेणी आहे. तर पुरुषांचा करार हा ४ श्रेणीत विभागला गेला आहे. ज्यात ए प्लस, ए, बी आणि सी अशी श्रेणी आहे.
बीसीसीआयकडून जाहीर करण्यात येणाऱ्या ए प्लस श्रेणीत अशा खेळाडूंना स्थान दिले जाते, जे वरिष्ठ आहेत आणि तिन्ही फॉरमॅट खेळतात. या यादीत वीर कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना ७ कोटी रूपये जातात. तर महिलांच्या स्मृती मान्धना , हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा यांना ए श्रेणीत समावेश आहे.
एकीकडे पुरुष क्रिकेटपटूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघ हा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. तर महिला संघाला अद्याप एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
आयपीएल ही जगभरातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग स्पर्धा आहे. प्रसार हक्कांच्या बाबतीत फुटबॉल लीग स्पर्धेनंतर आयपीएलचा नंबर लागतो. आयपीएलच्या यशानंतर बीसीसीआयने महिला प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरू केली आहे. त्यामुळे भारतीय महिला खेळाडूंना नवी ओळख मिळाली. भारतीय महिलांना अजूनही वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. जर भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश करून फायनलमध्ये प्रवेश केला आणि जेतेपदाचा मान पटकावला तर, महिला क्रिकेटचा दर्जा आणखी उंचावेल.