इंग्लंडचा आघाडीचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सने भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ”मला कसोटी क्रिकेट फारसे आवडत नाही, पण जेव्हा ऋषभ पंत फलंदाजीला येतो, तेव्हा मी त्याची खेळी नक्कीच पाहतो”, असे मिल्सने पंतची प्रशंसा करत म्हटले. टायमल मिल्स मर्यादित क्रिकेटमधील आपल्या वेगवान आणि संथ गोलंदाजीविषयी प्रसिद्ध आहे. त्याने आयपीएलमध्येही आपल्या वेगळ्या गोलंदाजीच्या शैलीमुळे नाव कमावले आहे.
टायमल मिल्सने एका वृतसंस्थेला मुलाखत देताना पंतविषयी भाष्य केले. तो म्हणाला, ”मी फक्त मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळतो. दुखापतीमुळे मी कसोटी क्रिकेट खेळत नाही. पारंपारिक कसोटी क्रिकेट पाहणे मला आवडत नाही, पण जेव्हा ऋषभ पंत फलंदाजीसाठी येतो, तेव्हा मी त्याला पाहतो. त्याला पाहून खूप आनंद होतो. तो एका बॉक्स ऑफिससारखा आहे, ज्यासाठी आपण आपला टीव्ही चालू करता.”
हेही वाचा – ‘‘अश्विन ४२व्या वयापर्यंत खेळून महान गोलंदाजाला मागे टाकू शकतो”
मागील वर्षी ऑस्ट्रेलिया दौर्यावर पंतने जबरदस्त कामगिरी कली होती. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या घरगुती कसोटी मालिकेतही त्याची कामगिरी चांगली झाली. या प्रदर्शनाबद्दलही मिल्सने प्रतिक्रिया दिली. ”पंतने अनेक उत्कृष्ट डाव खेळले जे पाहण्यासारखे होते. मला एंटरटेनिंग क्रिकेट आवडते. अहमदाबादमध्ये झालेल्या कसोटीत खेळपट्टी फिरकीला पोषक होते, तेव्हा मला खूप मजा आली होती, कारण प्रत्येक चेंडूवर काहीतरी घडत होते”, असे मिल्सने सांगितले.
२०१७च्या आयपीएल हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मिल्सला १२ कोटींची बोली लावत संघात घेतले. त्याला पाच सामने खेळता आले, मात्र चांगली कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला.
हेही वाचा – WTC स्पर्धेचा अंतिम सामना ड्रॉ झाला किंवा अनिर्णित सुटला, तर कोण असेल विजेता?
