ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने भारताच्या रवीचंद्रन अश्विनबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अश्विन मुथय्या मुरलीधरनचा ८०० कसोटी बळींचा विश्वविक्रम मोडेल, असे हॉगने भाकीत केले आहे. अश्विन आणखी आठ वर्षे खेळू शकतो आणि अष्टपैलू महान ऑफस्पिनर म्हणून निवृत्त होऊ शकतो, असेही हॉगने सांगितले. अश्विनने आतापर्यंत ४०९ कसोटी विकेट घेतल्या असून जगातील सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो १५व्या क्रमांकावर आहे. यावेळी अश्विनने ३० वेळा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी नोंदवली आहे आणि असा विक्रम करणारा तो जगातील सहावा गोलंदाज आहे.

हॉग म्हणाला, ”अश्विन आता ३४ वर्षांचा आहे. मला वाटते, की वयाच्या ४२व्या वर्षापर्यंत तो कसोटी सामना खेळू शकेल. माझा विश्वास आहे, की त्याच्या फलंदाजीतील कामगिरीत घट होईल, परंतु त्याची गोलंदाजी अधिक घातक होईल. मी त्याला किमान ६००हून अधिक विकेट घेताना पाहू इच्छित आहे. मुथय्या मुरलीधरनचा विक्रमही तो मोडू शकतो. तो इतका चांगला आहे, असे मला वाटण्याचे कारण म्हणजे तो परिस्थितीनुसार स्वतःला अनुकूल करतो आणि त्याला क्रिकेटच्या रुपाने प्रगती करण्याची भूक आहे.”

WTCमध्ये अश्विनला विक्रमाची संधी

रविचंद्रन अश्विनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात मोठा विक्रम करण्याची उत्तम संधी आहे. भारतीय संघ हा सामना न्यूझीलंडविरुद्ध १८ जूनपासून साऊथम्प्टन येथे खेळणार आहे. अश्विन अंतिम सामन्यात चार बळी घेण्यास यशस्वी ठरला तर तो या स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट घेणारा असेल.

हेही  वाचा – ‘‘सुशीलनं देशासाठी नाव कमावलं, पण मीडिया त्याला गुन्हेगार म्हणून सादर करत आहे”

अश्विनने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १३ सामने खेळले आणि ६७ बळी घेतले. सध्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या नावावर या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आहे. कमिन्सने १४ कसोटी सामन्यांत ७० बळी घेतले आहेत. अश्विनला आता हे विक्रम आपल्या नावावर करण्याची उत्तम संधी आहे.

अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंतच्या एका डावात चार बळी घेण्याचा पराक्रम चार वेळा केला आहे. या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लायन त्याच्या बरोबरीत आहे. लायनने या स्पर्धेत ५६ बळी घेतले आहेत.

अश्विनने या स्पर्धेत आतापर्यंत भारतात ९, ऑस्ट्रेलियामध्ये ३ आणि न्यूझीलंडमध्ये १ सामना खेळला आहे. त्याने भारतात सर्वाधिक बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने विदेशात १५ आणि घरच्या मैदानावर ५२ बळी घेतले आहेत. विदेशात घेतलेल्या ५२ पैकी ३२ बळी त्याने यावर्षी  यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये झालेल्या ४ सामन्यात घेतले आहेत. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत तो सामनावीर ठरला.

हेही वाचा – कुस्ती क्षेत्र पुन्हा हादरलं, सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूला अटक