वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान श्रीलंका इथे सुरू असलेल्या सामन्यात कीटकांनी उच्छाद मांडला. कोलंबोत आर.प्रेमदासा स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीदरम्यान कीटकांचा त्रास वाढल्याने फवारणी करावी लागली. खेळाडूंच्या डोळ्यात तसंच कानात हे कीटक जाऊ नयेत यासाठी काही काळ थांबवण्यातही आला.कीटकांना रोखणाऱ्या रसायनाच्या फवारणीनंतरही कीटक मैदानात होतेच मात्र त्यांची संख्या कमी झाल्याने सामना सुरू करण्यात आला. क्रिकेट सामना थांबवावा लागण्याचं कीटक हे एकमेव कारण नाही.

कीटकधाड

२०२४ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला टी२० सामना कीटकांमुळे थांबवावा लागला होता. सेंच्युरियन इथे कीटकांनी मैदानात थैमान घातल्यामुळे सामना अर्धा तास थांबवावा लागला होता. भारतीय संघाने २१९ धावांची मजल मारली. दुसऱ्या डावात खेळ सुरू झाला तेव्हा कीटकांचं आगमन झालं. अर्शदीपने पहिलं षटक कसंबसं टाकलं. मात्र कीटक खेळाडूंच्या डोळ्यात किंवा नाकात जाऊ शकतात यामुळे खेळ थांबवण्यात आला. कीटकांचा मारा कमी झाल्यावर अंपायर्सनी मैदानाचं परीक्षण केलं. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली.

मधमाशांचा हल्ला

दक्षिण आफ्रिका-श्रीलंका सामन्यादरम्यान मैदानात चक्क मधमाशांनी मैदानात आक्रमण केलं. श्रीलंकेचा संघ १९४/८ अशा स्थितीत असताना मधमाशा घोंघावू लागल्या. काही मिनिटांनी मधमाशा गायब झाल्या आणि खेळ सुरू झाला. २०१७ मध्ये मधमाशांनी मैदानाचा ताबा घेतला. त्यांना मैदानाबाहेर काढण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण करावं लागलं. जोहान्सबर्गच्या वाँडरर्स मैदानातलं ते दृश्य क्रिकेटचाहत्यांच्या आजही स्मरणात आहे. जवळपास सव्वा तास मधमाशांनी खेळ स्थगित ठेवला.

प्रखर सूर्यकिरणं

सूर्यप्रकाश नेहमीच हवाहवासा असतो. मात्र झालेल्या सामन्यात सूर्याची प्रखर किरणं खेळाडूंच्या थेट डोळ्यात येत असल्यामुळे खेळ थांबवावा लागला. १५ वर्षांच्या अंपायरिंग करिअरमध्ये असा प्रकार कधी पाहिला नव्हता असं अंपायर शॉन जॉर्ज यांनी सांगितलं. उत्तम वातावरण असतानाही अशा विचित्र कारणामुळे खेळ थांबवण्याची ही पहिलीच वेळ होती. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सूर्याने आपल्या प्रखरतेमुळे काही सामने थांबवले आहेत.

टोस्ट जाळला, अलार्म वाजला

टोस्ट जळल्यामुळे फायर अलार्म वाजू लागल्यामुळे सामना थांबल्याचा अनोखा प्रकार घडला आहे. ऑस्ट्रेलियातील डोमेस्टिक संघ न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँड यांच्यात सामना सुरू होता. वेल्स संघाला जिंकण्यासाठी १८ धावांची आवश्यकता असताना सामना थांबवाला लागला. संघातील एका खेळाडूच्या प्रतापामुळे हा प्रकार झाल्याचं नंतर लक्षात आलं. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयनने टोस्ट जाळला. यामुळे धूर होऊन फायर अलार्म सुरू झाला. मैदानात अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सामना सुरू झाला.

मैदानात आली गाडी

दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यातला रणजी सामना मैदानात गाडी अवतीर्ण झाल्यामुळे थांबवावा लागला. खेळाडू आणि अंपायर्सनी या माणसाला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकलाच नाही. या माणसाने मात्र मला कोणीही अडवलं नाही असा दावा केला. त्याने मैदानात २-३ फेऱ्या मारल्या. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सोशल मीडियावर याचा व्हीडिओ व्हायरल झाला. खेळांडूच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. गाडीमुळे खेळपट्टीचं, मैदानाचं नुकसान झालेलं नाही याची पाहणी केल्यानंतर सामना सुरू करण्यात आला.

जेवण यायला झाला उशीर

दक्षिण आणि बांगलादेश यांच्यातल्या सामन्यात दोन्ही संघांसाठीचं जेवण मैदानात पोहोचायला उशीर झाला. पाहुण्या बांगलादेश संघासाठी हलालाची व्यवस्थित करण्यात आली होती. मात्र तेच यायला उशीर झाला. दोन्ही संघांना स्वतंत्र केटरर होते. बांगलादेश संघाच्या केटररला चुकीचा मेन्यू देण्यात आल्याचं स्पष्ट झालं. जेवण पोहोचायला दीड तास अतिरिक्त वेळ लागला.

साप शिरला, गोंधळ उडाला

सिडनीजवळच्या ब्लॅकटाऊन इथे आयोजित सामन्यात साप मैदानात शिरल्याने गोंधळ उडाला. साप शिरल्यामुळे आयोजकांची पळापळ उडाली. २० मिनिटात त्या सापाला मैदानातून बाहेर काढण्यात आलं. भारत तसंच श्रीलंकेत अनेक सामन्यात साप मैदानावर अवतीर्ण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

बॉल गेला बार्बेक्यूत

१९९५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत डॅरेल कलिननने रॉजर टेलेमाकसच्या बॉलिंगवर मारलेला बॉल मैदानात एका प्रेक्षकाच्या बार्बेक्यूत जाऊन विसावला. त्या भट्टीत अन्नपदार्थ खरपूस शिजत होते, त्याबरोबर बॉललाही ज्वाळ मिळाला. बॉल परत घेण्यात आला मात्र भट्टीत जाऊन आल्यामुळे तो खेळण्याजोगा उरला नाही.

डुक्कर शिरलं मैदानात

१८८९ मध्ये वूस्टरशायर आणि डर्बीशायर यांच्या दरम्यानच्या सामन्यात एक भलंमोठं डुक्कर मैदानात शिरलं. ते मैदानात सैरावैरा पळू लागलं.

मैदानात पसरला बर्फ

१९७५ मध्ये डर्बीशायर आणि लँकेशायर यांच्यातील सामना मैदानात बर्फाची चादर पसरल्याने थांबवावा लागला होता.

ग्रहणामुळे पडला खंड

१९८० मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मुंबई इथे झालेला सामना ग्रहणामुळे खंडित झाला होता. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ग्रहणामुळे सूर्य झाकोळला जाणार असल्यामुळे विश्रांती दिन घेण्यात आला. इंग्लंडच्या इयन बॉथम यांनी पहिल्या दिवशी ६ विकेट्स घेतल्या. ग्रहणाच्या दिवशी विश्रांती घेतली. तिसऱ्या दिवशी शतक झळकावलं.