Allan lamb On Sachin Tendulkar: क्रिकेट या खेळाला १४८ वर्षांचा इतिहास आहे. यादरम्यान अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. संघातील एक खेळाडू निवृत्त झाल्यानंतर, त्याची जागा घेण्यासाठी दुसरा दिग्गज खेळाडू तयार झाला. भारतीय क्रिकेटमध्येही अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. कपिल देव, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर पोहोचवलं आहे. दरम्यान भारताचा दिग्गज खेळाडू कोण? यावर ॲलेन लॅम्ब यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना इंग्लंडचे माजी खेळाडू ॲलेन लॅम्ब यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ॲलेन लॅम्ब यांना भारतीय क्रिकेटमधील तीन पिढ्यांतील महान खेळाडू कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी जराही वेळ घेतला नाही. ते म्हणाले, ” सचिनचं नाव घेणं खूप सोपं आहे. कारण मला त्याच्याविरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे. त्यावेळी तो १८ वर्षांचा होता. मी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होतो त्यावेळी माझ्या हातून झेल सुटला. त्यानंतर त्याने शतक झळकावलं होतं. त्यामुळे मी त्याला नेहमी म्हणतो की, तुझं नाव माझ्यामुळेच झालं.”
भारतीय संघ १९९० मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर दोन्ही संघ ३ वेळेस आमनेसामने आले होते. ॲलेन लॅम्ब यांनी मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्याचा उल्लेख केला. या सामन्यात सचिनने ११९ धावांची खेळी केली होती. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक होते. या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने हा सामना ड्रॉ केला होता. ॲलेन लॅम्ब यांनी आपला आवडता खेळाडू म्हणून कपिल देव यांची निवड केली.
तसेच ते पुढे म्हणाले की, ” विराट कोहली हा उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्याकडे सर्व फटके आहेत. त्यामुळे तो जलद गतीने धावा करू शकतो. मी ज्या काळात क्रिकेट खेळलो त्या काळातील सर्वोत्तम खेळाडू कोण होता? असा विचारलं तर तो भारतीय खेळाडू सचिनच आहे. तो सनीपेक्षाही (सुनील गावसकर )पुढे आहे. मला फक्त सचिनने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेलं पाहायचं होतं. जिथे सनीने वेस्ट इंडिजविरुद्ध धावा केल्या होत्या. तो असा एकमेव खेळाडू होता ज्याने वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा केल्या होत्या.”