From Harbhajan Singh to Gautam Gambhir S Sreesanth’s controversies : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर आणि वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यातील वादाने क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील लिजेंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान दोघे आमनेसामने आले. दोन्ही खेळाडूंमध्ये बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यादरम्यान वाद झाला. श्रीसंत वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अनेकवेळा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. आतापर्यंत श्रीसंतशी संबंधित असलेल्या पाच मोठ्या वादांबद्दल जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. हरभजनसोबत झाला होता वाद –

२००८ मध्ये हरभजन सिंगसोबत श्रीसंतचा वाद झाला होता. तेव्हा श्रीसंत आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) कडून खेळायचा आणि हरभजन मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. एका सामन्यादरम्यान दोघांमधील वाद इतका वाढला की, लाइव्ह सामन्यात हरभजनने श्रीसंतला कानशिलात मारली. परिणामी हरभजनवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली.

२. श्रीसंत स्पॉट फिक्सिंगमध्येही अडकला होता –

२०१३ च्या आयपीएल हंगामादरम्यान, राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत आणि त्याचे दोन सहकारी अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले होते. हे सर्वजण आयपीएलदरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळले होते. बोर्डाच्या तपासणीत सर्व आरोप खरे ठरले आणि श्रीसंत आजीवन बंदी घालण्यात आली. तथापि, २०१५ मध्ये दिल्ली न्यायालयाने पुराव्याअभावी श्रीसंतला ‘मकोका’ कायद्यांतर्गत स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. त्यानंतर बीसीसीआयने श्रीसंतवरील बंदी सात वर्षांची केली. बंदी उठल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळचे प्रतिनिधित्व केले.

हेही वाचा – आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ कोण असेल? मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दोन दिग्गज खेळाडूंचे आव्हान

३. बिग बॉसमध्ये मित्रासोबत झाले होते भांडण –

श्रीसंतने २०१८ मध्ये भारतातील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसमध्येही भाग घेतला होता. शो दरम्यान, तो अभिनेता करणवीर बोरासह त्याच्या स्पर्धकांसोबत भांडताना दिसला. सीझनच्या सुरुवातीला बोरा आणि श्रीसंथ मित्र होते, पण जसजसे एपिसोड निघून गेले तसे ते शत्रू बनले आणि नेहमी एकमेकांशी वाद घालू लागले. या शोमध्ये श्रीसंतच्या बदलत्या वृत्तीने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले.

४. फसवणूक केल्याचा आरोप –

गेल्या महिन्यात श्रीसंतवर फसवणुकीचा आरोप झाला होता. पोलिसांनी श्रीसंतविरुद्ध केरळमध्येही गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार सरिश गोपालन यांनी आरोप केला आहे की, आरोपी राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी श्रीशांतच्या सहकार्याने स्पोर्ट्स अकादमी स्थापन करण्याचा दावा करून २५ एप्रिल २०१९ पासून वेगवेगळ्या तारखांना १८.७० लाख रुपये उकळले. ही अकादमी कर्नाटकातील कोल्लूर येथे बांधली जाणार होती. सरिशने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याला अकादमीचा भागीदार बनण्याची ऑफर देण्यात आली होती, ज्यासाठी त्याने पैसे गुंतवले. या प्रकरणी एस श्रीसंत आणि इतर दोघांविरुद्ध आयपीसी कलम ४२० अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी म्हणून श्रीसंतचा उल्लेख आहे.

हेही वाचा – LLC 2023 : ‘तो मला फिक्सर-फिक्सर…’, नवीन व्हिडीओमध्ये श्रीसंतने गौतमवर केले गंभीर आरोप, पाहा VIDEO

५. आता गौतम गंभीरशी झाला वाद –

गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील लिजेंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान श्रीशांत आणि गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. श्रीसंतने सांगितले की, गंभीर त्याला लाइव्ह सामन्यात फिक्सर म्हणाला. यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. श्रीसंत म्हणाला की, मी गंभीरला काहीही बोललो नाही आणि फक्त तो काय म्हणत आहे, असे विचारत होते. गंभीर या प्रकरणी आतापर्यंत काहीही बोलला नाही, पण त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने स्वत:चा हसतानाचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जेव्हा लोक फक्त जगात लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा फक्त हसत रहा.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From harbhajan singh to gautam gambhir s sreesanths name is associated with the five biggest controversies vbm