Gautam Gambhir Conditions For BCCI: सध्या चालू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या समाप्तीनंतर टीम इंडियाचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सुरुवातीला एकमेव स्पर्धक होता. राहुल द्रविडच्या जागी टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक गौतम होणार हे निश्चित होते. पण भारताचे माजी क्रिकेटपटू डब्ल्यूव्ही रमणही या स्पर्धेत उतरल्याचे आता समजतेय.

या आठवड्याच्या सुरुवातीला, गौतम गंभीर व रमण या दोघांनी प्रशिक्षक पदासाठीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीसमोर (सीएसी) उत्तम सादरीकरण करून दोघांनीही मुलाखतकर्त्यांना प्रभावित केलं. असं असलं तरी मीडियाच्या अहवालानुसार अजूनही गौतम गंभीरची प्रशिक्षकपदी वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे. येत्या काही दिवसांत बीसीसीआय भारताच्या माजी सलामीवीराची नवीन प्रशिक्षक म्हणून घोषणा करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आता गौतम गंभीरने बीसीसीआयसमोर ठेवलेल्या काही अटींची चर्चा होत आहे.

भारताच्या प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्यासाठी गौतम गंभीरच्या अटी:

गौतम गंभीरने भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्यापूर्वी पाच अटी घातल्या होत्या आणि वृत्तानुसार बीसीसीआयने त्या सर्व मान्य केल्या आहेत, असं समजतंय. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या माजी सलामीवीराने नवीन मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी घातलेल्या पाच अटी खालीलप्रमाणे..

पहिली अट अशी होती की, त्याला संघामध्ये अन्य कुणाचा हस्तक्षेप न असता पूर्ण नियंत्रण हवे होते. विश्वचषक विजेत्याने स्वतःचा सपोर्ट स्टाफ निवडण्याचे स्वातंत्र्य देखील मागितले. तिसरी अट होती की चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची संधी असावी.अहवालात असे म्हटले आहे की गंभीरने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा विशेषत: वरिष्ठ खेळाडू म्हणून उल्लेख केला आहे. चौथ्या अटीत गंभीरला पूर्णपणे वेगळा कसोटी संघ हवा होता तर त्याची शेवटची अट म्हणजे, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी रोडमॅप तयार करण्याची होती.

गौतम गंभीरने घातलेल्या पाच अटी:

  • संघाचे पूर्ण नियंत्रण, बाह्य हस्तक्षेप नसावा
  • सहाय्यक कर्मचारी (सपोर्ट स्टाफ) निवडण्याचे स्वातंत्र्य
  • चॅम्पियन्स ट्रॉफी ही वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची संधी असेल
  • वेगळा कसोटी संघ
  • २०२७ विश्वचषकासाठी रोडमॅप तयार करा.

हे ही वाचा<< आज पावसाची शक्यता किती टक्के? IND vs AUS सामना पावसाने वाहून गेला तर विश्वचषकाची उपांत्य फेरी कोण गाठणार?

कोहली, रोहितसह ‘या’ दोघांवरही टांगती तलवार?

अहवालात असेही म्हटले आहे की गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यास कोहली आणि रोहितसह रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनाही संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे.