अष्टपैलू हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी अतिशय मोलाचा आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर तो योगदान देतो. हार्दिक संघात नसेल तर संघाचं समीकरणच बदलतं. दुर्देवाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये हार्दिक दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. हार्दिकच्या जागी भारतीय संघाने रिंकू सिंगला समाविष्ट केलं आहे. रिंकू अतिशय सक्षम फिनिशर आहे आणि अफलातून फिल्डरही आहे मात्र भारतीय संघाला हार्दिकची उणीव भासेल यातच शंकाच नाही. दुर्देवी योगायोग असा की २०१८ मध्ये आशिया चषकातच हार्दिकला गंभीर दुखापत झाली होती. ७ वर्षानंतर याच स्पर्धेत पुन्हा एकदा दुखापत हार्दिकच्या मानगुटीवर बसली आहे.
२०१८ आशिया चषकात काय घडलं होतं?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१८ आशिया चषकाच्या लढतीत हार्दिकने गोलंदाजीला सुरुवात केली. ४ षटकात त्याने १८ धावा दिल्या. विकेट पटकावू शकला नव्हता. पाचवं षटक त्याने टाकायला सुरुवात केली. बाबर आझमने चेंडू पॉइंट क्षेत्राच्या दिशेने तटवून काढला. मात्र गोलंदाजी रनअपमध्येच हार्दिक मैदानावर कोसळला. सुरुवातीला क्रॅम्प असेल असं वाटलं. पाकिस्तानच्या फलंदाजांनीही त्याची विचारपूस केली. अतिशय उष्ण आणि दमट वातावरणामुळे क्रॅम्पचा त्रास जाणवत असेल असं सगळ्यांनाच वाटलं. भारतीय संघाच्या फिजिओंनी मैदानात धाव घेतली. क्रॅम्प नसून पाठीचं दुखणं असल्याचं स्पष्ट झालं. फिजिओंनी हार्दिकला मैदानातून ड्रेसिंगरुमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचर बोलावलं. महत्त्वाच्या क्षणी दुखापतग्रस्त झाल्याने हार्दिक अतिशय निराश झाला होता. राखीव खेळाडू आणि फिजिओंनी स्ट्रेचरच्या माध्यमातून हार्दिकला ड्रेसिंगरुममध्ये नेलं. चाहत्यांनी टाळ्यांच्या माध्यमातून त्याला हुरुप देण्याचा प्रयत्न केला. हार्दिकचं षटक अंबाती रायुडूने पूर्ण केलं. हार्दिक उर्वरित सामन्यात आणि स्पर्धेतही खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. पाठीची दुखापत स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचं डॉक्टरांच्या चाचणीनंतर स्पष्ट झालं. हार्दिकला शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागेल. अनेक महिन्यांच्या रिहॅब प्रक्रियेनंतर हार्दिकने पुनरागमन केलं.
त्या सामन्याचं काय झालं?
दुबईत झालेल्या त्या सामन्यात पाकिस्तानचा डाव १६२ धावांतच आटोपला. बाबर आझमने ४७ तर शोएब मलिकने ४३ धावा केल्या. भारतातर्फे केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी ३ तर जसप्रीत बुमराहने २ विकेट्स पटकावल्या. भारतीय संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं. रोहित शर्माने ३९ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. शिखर धवनने ४६ तर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी प्रत्येकी ३१ धावांची खेळी केली.
जेतेपद कोणी पटकावलं?
भारतीय संघाने अंतिम लढतीत बांगलादेशला नमवत जेतेपदाची कमाई केली. बांगलादेशला प्रथम फलंदाजी करताना २२२ धावांचीच मजल मारता आली. लिट्टन दासने १२१ धावांची झुंजार खेळी केली मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळू शकली नाही. भारताकडून कुलदीप यादवने ३ तर केदार जाधवने २ विकेट्स पटकावल्या. भारताला हे लक्ष्य गाठताना संघर्ष करावा लागला. कर्णधार रोहित शर्माने ४८ धावांची खेळी केली. दिनेश कार्तिकने ३७ तर महेंद्रसिंग धोनीने ३६ धावा केल्या. केदार जाधवने नाबाद २३ धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी २१ धावा करत त्याला चांगली साथ दिली. शिखर धवनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत काय झालं?
श्रीलंकेला २०३ धावांचं लक्ष्य मिळालं होतं. हार्दिकने डावाचं पहिलं षटक टाकलं. या षटकात त्याने कुशल मेंडिसला माघारी धाडलं. त्या षटकात हार्दिकने ७ धावा दिल्या. मात्र या षटकानंतर हार्दिक उपचारांसाठी ड्रेसिंगरुममध्ये परतला. तो पुन्हा मैदानात परतलाच नाही. त्यावेळीच तो फायनलमध्ये खेळू शकेल का याविषयी चर्चा सुरू झाली होती.