Asia Cup 2025 Hardik Pandya Jaw Dropping Catch: आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने ओमानविरूद्ध विजय मिळवत विजयाची हॅटट्रिक लगावली. पण नवख्या ओमानने मात्र भारताविरूद्ध उत्कृष्ट कामगिरी करत त्यांना सहज विजय मिळवू दिला नाही. पण भारतीय संघाने सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवला. पण या सामन्यात हार्दिक पंड्याने सीमारेषेजवळ टिपलेला झेल सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावा केल्या, पण प्रत्युत्तरात ओमानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली. ओमानने २० षटकांत ४ गडी गमावून १६७ धावा केल्या. ओमानकडून ४३ वर्षीय अमीर कलीमने सर्वाधिक ६४ धावा केल्या. हमाद मिर्झानेही ३३ चेंडूत ५१ धावा केल्या. जतिंदर सिंगने ३३ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. भारताची गोलंदाजी फारशी चांगली झाली नाही. हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेता आली.

या सामन्यात ओमानचे फलंदाज भारताच्या गोलंदाजांची शाळा घेत असतानाच आता सामना भारताच्या निसटतो की काय अक्षरश: अशी स्थिती निर्माण झाली होती. इतक्यात हर्षित राणाच्या १८व्या षटकात हार्दिक पंड्याने एक उत्कृष्ट झेल टिपत संघाला मोठी विकेट मिळवून दिली.

हार्दिक पंड्याचा झेल पाहून सगळेच झाले अवाक्, वरूण चक्रवर्तीने तोंडावर ठेवला हात

ओमानचा फलंदाज आमीर कलीम मैदानात मोठमोठे फटके खेळत होता. हर्षितच्या १८व्या षटकात त्याने पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार लगावले होते आणि नंतर चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी त्याने उजव्या बाजूला फ्लिक केला. तिथे फाईन लेगवर पंड्या तैनात होता. त्याने क्षणात उजव्या बाजूला हात आणि शरीराचा तोल टाकत एक कमालीचा झेल टिपला. फक्त झेलच नाही टिपला तर त्याने स्वत:चं शरीर सावरत सीमारेषेला पाय लागणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली.

हार्दिक पंड्याचा हा झेल पाहून वरूण चक्रवर्तीने तर तोंडावर हात ठेवत आश्चर्य व्यक्त केलं. तर बुमराहने देखील चकित होत त्याच्या झेलचं कौतुक केलं. हार्दिकचा हा झेल सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. अमीर कलीम मैदानावर चांगलाच सेट झाला होता. त्याने ४६ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६४ धावांची वादळी खेळी केली होती. ज्याचा टीम इंडियाला चांगलाच फटका बसत होता. पण हार्दिकचा हा टर्निंग पॉईंट असलेला झेल भारताच्या पथ्यावर पडला.

भारताला २१ सप्टेंबरपासून सुपर फोर सामने खेळायचे आहेत. पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघाविरूद्ध टीम इंडियाचे सामने असतील.