उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला अश्रू अनावर झाले होते. अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा अडथळा पार करून पहिल्या विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवल्यानंतर मात्र तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि समाधान दिसले. महिला क्रिकेटच्या नव्या पर्वाची ही नांदी असल्याची भावना हरमनप्रीतने व्यक्त केली. याआधी दोन वेळा उपविजेतेपद मिळवल्यानंतर यावेळी अंतिम रेषा पार केल्याचा फार आनंद असल्याचेही ती म्हणाली.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला आणि देशभर जल्लोषाला सुरुवात झाली. भारतीय महिला क्रिकेटसाठी ही नवी पहाट ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात असून हरमनप्रीतनेही याला दुजोरा दिला.
‘‘आम्ही याबाबत अनेक वर्षांपासून चर्चा करत होतो. गेल्या काही काळापासून आम्ही सातत्याने चांगले क्रिकेट खेळत होतो, पण आम्हाला मोठी स्पर्धा जिंकण्यात अपयश येत होते. परंतु या आव्हानांविना आताचा विश्वविजय इतका खास ठरला नसता,’’ असे हरमनप्रीत म्हणाली.
‘‘चाहत्यांना आपल्या आवडत्या संघाला जिंकताना पाहायचे असते. आम्हीही या क्षणाची खूप वर्षांपासून वाट पाहत होतो. आम्ही दोन वेळा खूप जवळ पोहोचलो, पण अखेरीस उपविजेतेपदावर समाधान मानले. आता अंतिम रेषा पार केल्याचा आनंद काही वेगळाच आहे. मी याबाबतची भावना शब्दांत मांडूच शकत नाही. मला माझ्या संघाचा खूप अभिमान आहे,’’ असे हरमनप्रीतने नमूद केले.
छोट्या शहरांतील मोठी प्रतिभा
विश्वविजेत्या महिला संघात मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज ही मोठ्या शहरातील एकमेव खेळाडू होती. कर्णधार हरमनप्रीत पंजाबमधील मोगाची, उपकर्णधार स्मृती मनधाना सांगलीची, रिचा घोष उत्तर बंगालमधील सिलिगुडीची, शफाली वर्मा हरियाणामधील रोहतकची, दीप्ती शर्मा आग्राची, श्री चरनी आंध्रमधील एरमलेची, रेणुका ठाकूर रोहरू नावाच्या डोंगराळ छोट्या शहरातून आहे. लहान शहरातील या मुलींना सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष करावा लागला. प्रशिक्षण, सरावाच्या फारशा सुविधा नव्हत्या. मात्र, त्यातूनही मार्ग काढून त्यांनी भारतीय महिला क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
‘‘लहानपणी मी मुलांबरोबर खेळायचे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझ्यातील प्रतिभा ओळखली आणि त्यानंतर वर्षभरातच मी देशाचे प्रतिनिधित्व करू लागले,’’ अशी आठवण हरमनप्रीतने सांगितली. आमच्या यशामुळे देशातील महिला क्रिकेटमध्ये मोठा बदल घडेल असा विश्वास हरमनप्रीतने यावेळी व्यक्त केला. आता भारतीय महिला संघाच्या यशाने देशातील लहान मुलींना प्रेरणा मिळेल आणि त्या क्रिकेटमध्ये कारकीर्द घडविण्याचा विचार करू लागतील अशी आशा असल्याचे ती म्हणाली.
माजी खेळाडूंचे योगदान
भारतीय महिला संघाच्या विश्वविजयात माजी खेळाडूंचेही योगदान मोठे असल्याचे हरमनप्रीत म्हणाली. यावेळी तिने झुलन गोस्वामी आणि अंजुम चोप्रा या माजी कर्णधारांचा आवर्जुन उल्लेख केला. ‘‘मी जेव्हा पहिल्यांदा भारतीय संघात आले, तेव्हा झुलनदीने मला सर्वाधिक पाठिंबा दिला. त्यावेळी मी केवळ एक प्रतिभावान खेळाडू होते. माझी शैली, तंत्र यावर बरेच काम करावे लागणार होते. मात्र, झुलनदीने कधीही माझी साथ सोडली नाही. अंजुमदीचे पाठबळही मोलाचे ठरले. ती कुठेही जाताना मला बरोबर घेऊन जायची. तिच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे आमच्या यशात झुलनदी आणि अंजुमदी यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे,’’ असे हरमनप्रीतने नमूद केले.
यंदाच्या स्पर्धेत आम्हाला सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले. विशेषत: इंग्लंडविरुद्धचा पराभव जिव्हारी लागला. आम्ही सुस्थितीत होतो, पण त्यानंतर आमचा डाव गडगडला. त्यावेळी प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी आम्हाला खडेबोल सुनावले होते. आपण पुन्हा-पुन्हा त्याच चुका करू शकत नाही असे त्यांनी खडसावले. तेव्हापासून गोष्टी बदलल्या. आम्ही अधिक विश्वासाने खेळण्यास सुरुवात केली. अखेरीस आम्हाला त्याचे फळही मिळाले. – हरमनप्रीत कौर
