How Virat Kohli Entered In RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स आणि आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत असणारा संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ. या संघाच्या चाहत्यांनी १७ वर्ष जेतेपदासाठी वाट पाहिली. कधी साखळी फेरी, कधी प्लेऑफ्स कर कधी फायनलमध्ये जाऊन या संघाच्या हातून ट्रॉफी थोडक्यात निसटली. पण या संघाच्या चाहत्यांनी जिंकण्याची आस सोडली नाही.अखेर १८ व्या हंगामात पंजाब किंग्जला पराभूत करून या संघाने जेतेपदाची पहिली ट्रॉफी उंचावली. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने हा संपूर्ण प्रवास अगदी जवळून पाहिला आहे. आता हा संघ विक्रीसाठी काढला आहे. त्यामुळे या संघाला नवा संघमालक मिळणार आहे. दरम्यान विराट कोहलीची या संघात एंट्री कशी झाली? जाणून घ्या.
आयपीएलची सुरूवात २००८ मध्ये झाली. भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या या स्पर्धेने अनेकांना स्टार बनवलं. त्यापैकीच एक म्हणजे,विराट कोहली. विराटने भारतीय संघाला नुकताच अंडर १९ वर्ल्डकप जिंकून दिला होता. या स्पर्धेत त्याने २३५ धावा केल्या होत्या. त्यामुळे विराट कोहली हे नाव चर्चेत होतं. ज्यावेळी आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामासाठी लिलाव झाला, त्यावेळी सर्व संघांना अंडर १९ संघातील किमान १ खेळाडूला संघात घेणं बंधनकारक होतं. त्यावेळी दिल्ली डेअरडेव्हिल्स ( दिल्ली कॅपिटल्स) संघाला लॉटरी लागली होती. दिल्लीला दिल्लीकर विराटला आपल्या संघात घेण्याची सुवर्णसंधी होती. पण दिल्लीने प्रदीप सांगवानला आपल्या संघात घेतलं. आयपीएल स्पर्धेतील लिलावाच्या इतिहासातील सर्वात आश्चर्यचकीत करणारा निर्णय कुठला असेल, तर तो हाच असावा.
विराटच्या बॅटमधून धावा येत नाही, असाही मुद्दा नव्हता. पण दिल्लीला प्रदीप सांगवानसारख्या अष्टपैलू खेळाडूला संघात घेणं जास्त महत्वाचं वाटलं. पण प्रदीपला संघात घेण्याच्या नादात विराटसारखा भविष्यातील स्टार फलंदाज त्यांच्या हातून निसटला. दिल्लीने सोडलेल्या संधीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दोन्ही हातांनी स्वीकार केला. विराटला आपल्या संघात स्थान दिलं आणि त्याला खेळण्याची संधी सुद्धा दिली. अवघ्या एका वर्षात त्याला भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. या लिलावात विराटची मुळ किंमत केवळ १२ लाख रूपये होती. या लिलावात १२ लाखांमध्ये खरेदी केल्यानंतर, विराट पुन्हा कधीच लिलावात आला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्याला प्रत्येक हंगामात रिटेन केलं. त्यामुळे त्याच्या मानधनातही झपाट्याने वाढ झाली. या स्पर्धेच्या इतिहासात एकदाही बोली न लागण्याचा विक्रम हा विराटच्या नावे नोंदवला गेला आहे.
विराटसारखा खेळाडू इतक्या कमी रकमेत मिळणं हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी मास्टरस्ट्रोक ठरला. विराटने केवळ धावा नाही केल्या, तर पुढे जाऊन तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा चेहरा बनला. विराट या संघाकडून खेळतो, म्हणून जगभरात या संघाची चर्चा आहे. या संघासाठी फलंदाज, खेळाडू आणि कर्णधार म्हणून त्याने मोलाचं योगदान दिलं आहे. अखेर १७ वर्ष ट्रॉफीची वाट पाहिल्यानंतर २०२५ मध्ये हा संघ पहिल्यांदा जेतेपदाचा मानकरी ठरला.
