Mitchell Starc spoke openly about his rivalry with Virat Kohli : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे २२ नोव्हेंबरपासून सुरू बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरु होणार आहे. या मालिकेत भारताचा स्टार फलदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हे दोन क्रिकेटपटू पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी मिचेल स्टार्कने विराट कोहलीशी असलेल्या आपल्या स्पर्धेबद्धल खुलेपणाने मत व्यक्त केले आहे. या भारतीय फलंदाजाविरुद्धच्या सामन्याचा आनंद घेत असल्याचे त्याने म्हटले आहे.

कोहलीसोबतच्या माझ्या स्पर्धेचा आनंद घेतो – मिचेल स्टार्क

विराट कोहली आणि मिचेल स्टार्क १९ डावांमध्ये आमनेसामने आले आहेत. या कालावधीत भारतीय फलंदाजाने ३९४ चेंडूत ५९ च्या सरासरीने २३६ धावा केल्या आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने कोहलीला चार वेळा आऊट केले आहे.
मिचेल स्टार्कने एका स्पोर्ट्स चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी विराट कोहलीसोबतच्या माझ्या स्पर्धेचा आनंद घेतो. कारण आम्ही एकमेकांविरुद्ध भरपूर क्रिकेट खेळलो आहोत. आमच्यामध्ये काही रोमांचक सामने झाले आहेत. मी त्याला एक-दोनदा बाद करण्यात यशस्वी झालो आहे. तसेच त्याने माझ्याविरुद्ध खूप धावा केल्या यात शंका नाही. त्यामुळे ही नेहमीच चांगली स्पर्धा असते ज्याचा आम्हा दोघानाही आनंद मिळतो.”

विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियात चांगला रेकॉर्ड –

विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियातील कसोटी रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने १३ कसोटी सामन्यांमध्ये ५४.०८ च्या सरासरीने १३५२ धावा केल्या आहेत, ज्यात ६ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या १६९ धावा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २५ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४७.४८ च्या सरासरीने २०४२ धावा केल्या आहेत, ज्यात ८ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा – कोण आहेत टीम इंडियाचे भावी विराट-रोहित? पियुष चावलाने सांगितली ‘या’ दोन खेळाडूंची नावं?

बांगलादेशच्या आव्हानासाठी विराट कोहली सज्ज –

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेपूर्वी टीम इंडियाला १९ सप्टेंबरपासून बांगलादेशशी सामना करावा लागणार आहे. यासाठी कोहलीने चेन्नईला पोहोचून सरावाला सुरुवात केली आहे. कोहली या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकला नव्हता. आता तो कसोटी फॉरमॅटमध्ये आपली छाप सोण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. सराव सत्रादरम्यान, त्याने ४५ मिनिटे फलंदाजीचा सराव केला.