Virender Sehwag On His Retirement: वीरेंद्र सेहवाग हा भारतीय संघातील आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकी आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी करण्याचा विक्रम हा सेहवागच्या नावावर आहे. २०११ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप भारतीय संघाने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. ही स्पर्धा जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, त्याला या स्पर्धेआधीच निवृत्ती जाहीर करायची होती. धोनीने बराच वेळ प्लेइंग ११ मध्ये स्थान न दिल्याने त्याने निवृत्ती घेण्याची तयारी केली होती. पण सचिन तेंडुलकरने त्याला हा निर्णय घेण्यापासून रोखलं होतं.
ऑस्ट्रेलियात २००७-०८ मध्ये झालेल्या सीबी सिरीज मालिकेत वीरेंद्र सेहवागचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. या मालिकेतील पाचही सामन्यात त्याला १६.२० च्या सरासरीने अवघ्या ८१ धावा करता आल्या होत्या. या फ्लॉप शो नंतर त्याला भारतीय संघातून बाहेर करण्यात आलं होतं. त्यानंतर ६ महिन्यांनंतर त्याला पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. पुनरागमन केल्यानंतर त्याने ३ सामन्यात १५० धावा केल्या होत्या.
वीरेंद्र सेहवागने पदमजीत सेहरावतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “२००७-०८ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या सीबी सिरीज मालिकेतील सुरुवातीच्या ३ सामन्यात मला खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर मला संघाबाहेर करण्यात आलं होतं. त्यानंतर बराच वेळ मला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. जर मला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार नसेल, तर मग वनडे क्रिकेट खेळण्यात काहीच अर्थ नाही, असे विचार मला येऊ लागले होते.”
ज्यावेळी त्याला निवृत्ती घेण्याचे विचार येत होते, त्यावेळी तो सचिन तेंडुलकरकडे गेला आणि म्हणाला,”मी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करतोय.” त्यावेळी सचिन त्याला म्हणाला, “नको,१९९९-२००० साली माझ्यावरही अशीच वेळ आली होती. मलाही वाटलं होतं की, मी क्रिकेटला रामराम करावं. पण ती वेळ निघून गेली. तू देखील त्याच स्थितीत आहेस. ही वेळ निघून जाईल. भावूक होऊन कुठलाही निर्णय घेऊ नकोस. स्वत:ला पुरेसा वेळ दे, १-२ मालिका खेळल्यानंतर मग तुला जो योग्य वाटेल तो निर्णय घे.” वीरेंद्र सेहवाग २०११ वर्ल्डकपआधीच निवृत्ती जाहीर करणार होता. पण त्याने पुनरागमन केलं आणि वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. २०१५ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला.