Rohit Sharma react on New York drop in pitch : टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेचा आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज करत आहेत. भारताने आयर्लंडला हरवून आपल्या मोहिमेची विजयाने सुरुवात केली आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात बलाढ्य भारताने दुबळ्या आयर्लंडचा ८ गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने खेळपट्टीबाबत निराशा व्यक्त केली. न्यूयॉर्कची खेळपट्टी ‘ड्रॉप इन पिच’ असल्याने त्याने नाराजी व्यक्त केली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडचा संघ १६ षटकांत सर्वबाद ९६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १२.२ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा आठ गडी राखून पराभव केला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ३७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली. मात्र, या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार ‘रिटायर्ड हर्ट’ झाला होता.

न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर रोहित शर्मा नाराज-

सामन्यानंतर रोहित म्हणाला, “नवीन मैदान, नवे ठिकाण आणि आम्हाला येथे खेळताना कसे वाटते ते पहायचे होते. मला वाटते की खेळपट्टी अद्याप स्थिर झालेली नाही आणि त्यामुळे गोलंदाजांना खूप मदत होत आहे. अशा परिस्थितीत, आमच्या मूलभूत गोष्टींवर टिकून राहणे आणि कसोटी सामन्यातील गोलंदाजी लक्षात ठेवणे महत्त्वाचे होते.”

हेही वाचा – IND vs IRE : भारताने आयर्लंडवर मात करत पाकिस्तानला टाकले मागे, टी-२० विश्वचषकात ‘हा’ विक्रम करणारा ठरला दुसरा संघ

संघाच्या गरजेनुसार आम्ही बदल करू –

अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीचे कौतुक करताना रोहित शर्मा म्हणाला, “उजव्या हाताच्या फलंदाजांसमोर चेंडू स्विंग करून लय निर्माण करण्यात अर्शदीप माहीर आहे. अशा मैदानावर चार फिरकीपटूंना मैदानात उतरवता येईल, असे मला वाटत नाही. जर परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल असेल तर तेच खेळतील. फिरकीपटूनंतर स्पर्धेत त्यांची भूमिका पार पाडतील. त्यामुळे संघाच्या गरजेनुसार आम्ही बदल करू.”

हेही वाचा – IND vs IRE : रोहित शर्माने धोनीला मागे टाकत रचला इतिहास! ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच कर्णधार

भारताच्या वेगवान माऱ्यापुढे आयर्लंडने टेकले गुडघे –

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरला. भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करताना आयर्लंडचा डाव १६ षटकांत ९६ धावांत गुंडाळला. यादरम्यान हार्दिक पंड्याने ४ षटकात केवळ २७ धावा दिल्या आणि सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने २-२ फलंदाजांना बाद केले. दुसरीकडे अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.