संपूर्ण विश्वचषक स्पर्धेमध्ये निर्भेळ यश संपादन करणाऱ्या भारतीय महिलांचा रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात दारुण पराभव झाला. एलिसा हिली आणि बेथ मूनी यांच्या झंझावातापुढे भारतीय महिला संघ पूर्णपणे निष्प्रभ ठरल्या आणि पहिल्यावहिल्या विश्वचषकावर नाव कोरण्याचे भारताचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले. ऑस्ट्रेलियाने भारतावर ८५ धावांनी विजय मिळवत पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली. भारताच्या या पराभवानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी आणि नेते मंडळींनी भारतीय महिला संघाला निराश न होता प्रयत्न करत राहा असा सल्ला देत त्यांच्या कामगिरीसाठी अभिनंदन केले आहे. मात्र भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुली याने केलेल्या एका ट्विटमुळे तो आणि बीसीसीआयचे सचिव तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह ट्रोल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय महिलांचा पराभव झाल्यानंतर अनेक नेते मंडळींनी आणि आजी माजी क्रिकेटपटूंनी ट्विटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेकांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन करत तुम्ही मन लावून खेळलात. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे, अशा आशयाचे ट्विट केले. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ यांच्यासहीत अन्य मान्यवरांचाही समावेश होता.

भारतीय महिलांचे कौतुक बीसीसीआयच्या अध्यक्ष असणाऱ्या सौरव गांगुलीनेही भारतीय महिला संघाचे कौतुक केले. मात्र या ट्विटमध्ये त्याने चक्क जय शाह यांचे कौतुक केले आहे. गांगुलीने शाह यांना टॅग करुन केलेल्या ट्विटमुळे गांगुली आणि शाह दोघेही चर्चेत आले आहेत.

काय म्हणाला गांगुली

सौरभ गांगुलीने ट्विटवरुन भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केलं आहे. “खूप छान कामगिरी केली भारतीय महिला क्रिकेट संघ आणि जय शाह. सलग दोन विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये भारतीय संघ गेला. आपला पराभव झाला तरी तुम्ही उत्कृष्ट आहात. आपण लवकरच आपले (विश्वचषक जिंकण्याचे) लक्ष्य साध्य करु. संघाला आणि खेळाडूंना खूप सारे प्रेम,” असं गांगुलीने ट्विट केलं आहे.

या ट्विटमध्ये जय शाह यांचा उल्लेख आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. भारतीय महिला संघाच्या कामगिरीमध्ये जय शाह यांचा वाटा काय?, जय शाह यांनी किती धावा केल्या? जय शाह यांचे अभिनंदन करण्याचे कारण काय? जय शाह कुठून आले मध्येच? जय शाहचा काय संबंध असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी गांगुलीला विचारले आहेत. या ट्विटवरुन एवढी चर्चा झाली की Jay Shah आणि Dada हे दोन शब्द ट्विटवर टॉप ट्रेण्ड होताना दिसले. दिवसोंदिवस गांगुलीबद्दलचा आदर कमी होऊ लागला आहे, असंही मत अनेक नेटकऱ्यांनी नोंदवलं आहे. जाणून घेऊयात काय म्हणाले आहेत नेटकरी…

आम्हाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेलात तुम्ही

कितव्या क्रमांकावर?

जय शाह कोण?

सर्व नेतृत्व त्यांनीच केलं

कधी वाटलं नव्हतं

शेवटच्या चेंडूवर षटकार मारतील

एवढ्या धावा केल्या

जरा सांग काय केलं त्यांनी?

..म्हणून टॅग झालं असेल

त्याला रिपोर्ट करतोय का तू?

पोपटपंची

अमित शाह यांचेही अभिनंदन

त्यांचा काय संबंध?

असं असतानाही?

म्हणून केलं टॅग

सन्मान गमावतोय

२३ ऑक्टोबर २०१९ रोजी सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र सांभाळली. याचवेळी जय शाह यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीवरुन विरोधकांनी भाजपावर टीकाही केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc womens wt20 twitter upset with sourav ganguly for tagging jay shah in message to team india scsg