भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला संपन्न झाला. अवघ्या अडीच दिवसात भारतीय गोलंदाज खास करून जडेजा-अश्विन या फिरकी जोडगोळीने कांगारूंची पळताभुई थोडी केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवत बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २-०ने विजयी आघाडी घेतली. १००वी कसोटी खेळणारा चेतेश्वर पुजाराने विजयी चौकार मारला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ १ विकेट गमावत ६२ धावांच्या आघाडीसह फलंदाजीला उतरला होता. यावेळी भारताच्या रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्या. त्यांचे ४ फलंदाज तर एकाच धावसंख्येवर तंबूत परतले. यावेळी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ३१.१ षटकात ११३ धावांवर संपुष्टात आला. भारताच्या दुसऱ्या डावात ११५ धावांचा पाठलाग करताना सुरुवात फार चांगली झाली नाही. अवघ्या ६ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. राहुल केवळ एकच धाव काढू शकला. त्यानंतर रोहित शर्माने मोठे फटके मारत भारताचा डाव पुढे नेला. मात्र ३९ धावांवर रोहित धावबाद झाला. त्याने ३१ धावा केल्या ज्यात ३ चौकार तर २ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला देखील फार काही करता आले नाही. २० धावा करून तो बाद झाला तर श्रेयस अय्यर मोठा फटका मारताना १२ धावा करून बाद झाला. १०० वी कसोटी खेळणाऱ्या पुजाराने संयमी खेळी दाखवत भारताला विजयापर्यंत पोहोचवले. त्याने ३१ धावा केल्या. यष्टीरक्षक केएस भरतने २३ धावा करून दोन्ही नाबाद राहिले.

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रेविस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४६ चेंडूत ४३ धावा केल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ६ चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त मार्नस लाबुशेन याने ३५ धावांचे योगदान दिले. यावेळी इतर एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. लाबुशेन, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकाँब आणि कर्णधार पॅट कमिन्स हे चार खेळाडू ९५ धावसंख्येवर बाद झाले.

भारताकडून यावेळी गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा पुन्हा चमकला. त्याने यादरम्यान सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या. तसेच, कसोटी कारकीर्दीतील विकेट्सचे १२वे पंचकही पूर्ण केले. त्याच्यासोबतच, आर अश्विन  यानेही ३ विकेट्स नावावर केल्या. भारताच्या दुसऱ्या देशांसाठी घातक असणाऱ्या जडेजा-अश्विन जोडीने कांगारूंना अक्षरशः घाम फोडला. त्यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज कत्थक करताना दिसले. दुसऱ्या डावात ११३ धावांवर ऑस्ट्रेलिया डाव आटोपला आणि विजयासाठी ११५ धावांचे माफक आव्हान ठेवले होते आणि भारताने ते सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: अश्विनशी पंगा भर मैदानात दंगा! लाबुशेन-स्मिथला भरली धडकी तर किंग कोहलीला हसू अनावर, पाहा Video

आता पुढील तिसरा कसोटी सामना १ मार्च ते ५ मार्च दरम्यान इंदोरमध्ये खेळवला जाणार आहे. धर्मशाला येथे खरतर हा सामना होणार होता मात्र तेथील हवामान व्यवस्थित नसल्याने ते मैदान खेळण्यासाठी तयार होऊ शकले नाही म्हणून तो इंदोर येथे हलवण्यात आला. दोन्ही संघांना आता किमान आठ ते नऊ दिवसांचा वेळ मिळणार आहे. त्यात भारतीय संघाची उर्वरित दोन कसोटीसाठी निवड होणार असून कोणाला संघात स्थान मिळणार ह्याची चाहत्यांना उत्सुकता असेल.  

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ७८.४ षटकांत सर्वबाद २६३

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव): ३१. षटकात सर्वबाद ११३

भारत (पहिला डाव) : ८३.३ षटकांत सर्वबाद २६२

भारत (पहिला डाव) : २६.४ षटकात ४ बाद ११५ (टीम इंडिया विजयी)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ind vs aus 2nd test game over in just two and a half days india beat australia by six wickets 2 0 lead in the series avw