Asia Cup 2025 India Beat Sri lanka in Super Over: आशिया चषक २०२५ मध्ये श्रीलंका आणि भारत यांच्यात अखेरच्या सामन्यात सुपर ओव्हर खेळवली गेली आणि भारताने सुपर ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर विजय मिळवला. या विजयासह टीम इंडिया या स्पर्धेत अजेय राहिली आहे. आशिया चषक फायनलचे दोन्ही संघ ठरले असल्याने हा सामना तसा फारसा महत्त्वाचा नव्हता. पण श्रीलंकेच्या संघाने भारताला फायनलपूर्वीच्या सामन्यात तगडी टक्कर दिली आहे. अखेरीस भारताने उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला. अर्शदीपची या सामन्यातील गोलंदाजी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली.

अखेरच्या षटकात नेमकं काय घडलं?

अखेरच्या षटकात श्रीलंकाला विजयासाठी ६ चेंडूत १२ धावांची गरज होती. हर्षित राणाकडे गोलंदाजीची जबाबदारी होती. हर्षितने पहिल्याच चेंडूवर शतकवीर निसांकाला झेलबाद केलं. यानंतर दुसऱ्या चेंडूवर २ धावा, तिसऱ्या चेंडूवर बायची १ धाव, चौथ्या चेंडूवर २ धावा दिल्या. तर पाचव्या चेंडूवर शनाकाने चौकार मारला. यानंतर अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेण्यात आल्या. शनाकाने दुसरी धाव घेत तो स्ट्राईकर एन्डला डाईव्ह मारत झोपून राहिला. जर शनाका उठला असता तर तिसरी धाव झाली असती कारण भारताचे खेळाडू घाईघाईत चेंडू टिपण्यात चुकले होते. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला आणि सुपर ओव्हरमध्ये सामना गेला.

IND vs SL: सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?

सुपर ओव्हरमध्ये भारताकडून अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर कुसल परेरा झेलबाद झाला. यानंतर कुसल मेंडिस फलंदाजीला आला. त्याने पुढच्या चेंडूवर शनाकाला स्ट्राईक दिली. तिसरा चेंडू निर्धाव राहिला. चौथ्या चेंडू वाईड राहिला. यानंतर चौथ्या चेंडूवर झेलबादचं अपील भारताने केलं आणि संजूने लगेच धावबाद देखील केलं. यानंतर पंचांनी झेलबादसाठी निर्णय दिल्याने शनाकाने रिव्ह्यू घेतला आणि तो नाबाद राहिला. त्यामुळे संजूने केलेलं धावबाद होईपर्यंत चेंडू डेड झाला होता. यासह भारताला विजयासाठी ३ धावांचं लक्ष्य देण्यात आलं.

भारताकडून फलंदाजीला शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादवची जोडी मैदानात आली. श्रीलंकेकडून हसरंगा गोलंदाजीला आला होता. सूर्यादादाने पहिल्याच चेंडूवर कमालीचा कव्हर ड्राईव्ह खेचला आणि गिलबरोबर त्याने ३ धावा काढत पहिल्याच चेंडूवर विजय मिळवला.

भारताने श्रीलंकेला विजयासाठी २०३ धावांचं लक्ष्य दिलं होतं. श्रीलंकेने प्रत्युत्तरात पहिल्या षटकात पहिली विकेट गमावली. पण यानंतर पथुम निसांका व कुसल परेरा यांनी शतकी भागीदारी रचत भारताच्या गोलंदाजांची शाळा घेतली. पथुम निसांकाने यंदाच्या आशिया चषकातील पहिलं शतक झळकावलं. निसांकाने ५२ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह १०१ धावा करत शतक झळकावलं आहे. तर कुसल परेराने ३२ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावांची खेळी केली. भारताकडून हार्दिक पंड्या, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव व अर्शदीप सिंग यांनी १-१ विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २०२ धावांचा डोंगर उभारला. भारताची ही धावसंख्या आशिया चषक २०२५ मधील सर्वाेच्च धावसंख्या ठरली. भारताच्या या मोठ्या धावसंख्येत भारताच्या सर्व फलंदाजांनी योगदान दिलं. अभिषेक शर्माने पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. अभिषेकने ६१ धावांची उत्कृष्ट खेळी केली.

अभिषेकनंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव पुढे नेला. तिलक वर्मा ४९ धावा करत नाबाद माघारी परतला. अवघ्या एका धावेसह त्याचं अर्धशतक हुकलं. तर संजू सॅमसन ३ षटकारांसह ३९ धावांची उत्कृष्ट खेळी करत बाद झाला. यानंतर अक्षर पटेलने २१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत तिलकसह ४० धावांची भागीदारी रचली आणि संघाला २०० धावांचा आकडा पार करून दिला. श्रीलंकेकडून नुवान तुषारा वगळता सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.