Rohit Sharma Wicket, IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या रोहित शर्माला हवी तशी सुरूवात करून देता आलेली नाही.
हा सामना रोहित शर्मासाठी अतिशय खास आहे. कारण रोहितला तब्बल ८ महिन्यांनंतर भारतीय वनडे संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, पुनरागमनात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. रोहितने गिलसोबत मिळून डावाची सुरूवात केली. खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी त्याने सुरूवातीचे काही चेंडू त्याने खेळून काढले. पण जोश हेजलवूडने टाकलेल्या चेंडूवर त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.
तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी चांगलीच फायदेशीर ठरते. याचा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी मैदानावर आली. सुरूवातीच्या काही षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना चांगलीच उसळी मिळत होती. त्यामुळे रोहितला गती आणि उसळीचा अंदाज घेता आला नाही.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना चौथे षटक टाकण्यासाठी जोश हेजलवूड गोलंदाजीला आला. या षटकातील सुरूवातीचे ३ चेंडू रोहितने सोडून दिले. तर चौथा चेंडू हेजलवूडने शॉर्ट टाकला. हा चेंडू वेगाने उसळी घेऊन आत आला त्यामुळे रोहितला चेंडूच्या उसळीचा आणि गतीचा अंदाज घेता आला नाही. चेंडू बॅटचा कडा घेत दुसऱ्या स्लीपमध्ये गेला. रेनशॉने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला. त्यामुळे रोहितला पुनरागमनात स्वस्तात माघारी परतावं लागलं.
रोहित शर्मा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेनंतर पहिल्यांदाच वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. २२३ दिवसांनंतर पुनरागमन करताना त्याच्याकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती.सुरुवातीला फलंदाजी करताना त्याने सावध सुरूवात केली पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्याला स्वस्तात बाद करत माघारी धाडलं आहे.
