IND vs AUS 1st Test: Mohammed Siraj's trap ball and Usman Khawaja's dismissal Rahul Dravid's reaction goes viral Watch Video | Loksatta

IND vs AUS 1st Test: मोहम्मद सिराजचा तेजतर्रार चेंडू अन् उस्मान ख्वाजा बाद, राहुल द्रविडची रिअ‍ॅक्शन व्हायरल, पाहा Video

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला आजपासून सुरुवात होत असून नाणेफेक जिंकत पाहुण्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. अवघ्या दोन धावांवर दोन विकेट्स पडल्या होत्या.

IND vs AUS 1st Test: Mohammed Siraj's trap ball and Usman Khawaja's dismissal Rahul Dravid's reaction goes viral Watch Video
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारी (९ फेब्रुवारी) सुरू झाला. नागपूरमच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला असून पाहुण्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी टी२० फॉरमॅट गाजवणारा फलंदाज सूर्यकुमार यादव या सामन्यातून कसोटी कारकिर्दीची सुरुवात करत आहे. भारतीय दिग्गज आणि संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून सूर्यकुमार यादवला संघाची ‘टेस्ट डेब्यू कॅफ’ मिळाली.

आउट ऑफ सिलॅबस प्रश्न आले

दोन धावांवर ऑस्ट्रेलियन संघाला पहिला धक्का बसला आहे. उस्मान ख्वाजा तीन चेंडूत एक धाव काढून बाद झाला आहे. मोहम्मद सिराजने या सामन्यात पहिल्याच चेंडूवर भारताला यश मिळवून दिले. त्याने उस्मान ख्वाजाला स्टंपसमोर पायचीत केले. अंपायरने ख्वाजाला आधी आऊट दिले नसले तरी सिराजने कर्णधार रोहितला डीआरएस घेण्यास भाग पाडले आणि रिव्ह्यूमध्ये चेंडू स्टंपला आदळत असल्याचे दिसून आले. अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला आणि टीम इंडियाला पहिलं यश मिळालं.

ऑस्ट्रेलियाचा संघ फिरकीची तयारी करून आला होता आणि बाद मात्र दोन्ही मोहम्मद यांनी केले. त्यामुळे त्यांच्यासाठी आउट ऑफ सिलॅबस प्रश्न आले होते असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. त्यावेळी भारतीय संघाचा शांत स्वभावाचा प्रशिक्षक राहुल द्रविड देखील खूप खुश झाला. त्याचा जल्लोष केलेला व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

खाव्जाच्या विकेटनंतर सावरत नाही तेवढ्यात मोहम्मद शमीने भारताला आणखी एक यश मिळवून दिले आहे. त्याने आतल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला त्रिफळाचीत केले आणि ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठवले. वॉर्नरने पाच चेंडूत एक धाव घेतली. आता स्टीव्ह स्मिथसोबत मार्नस लॅबुशेन क्रीजवर आहे. अवघ्या दोन धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट्स पडल्या होत्या, पण त्यानंतर मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी आक्रमक फलंदाजी केली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ही १५ षटकात ३३-२ अशी आहे.

सामन्याआधी खेळपट्टीवरून रोहितने घेतले ऑस्ट्रेलियाला फैलावर

खेळाआधीच्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला, “खेळपट्टी बाबत मला वाटतं की पुढचे पाच दिवस खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावं लागेल. खेळपट्टीची जास्त काळजी करू नका. आम्ही येथे शेवटच्या मालिकेत खेळलो. खेळपट्ट्यांबद्दल खूप चर्चा झाली, जे २२ क्रिकेटपटू खेळणार आहेत, ते सर्व टॉप क्लास क्रिकेटर आहेत. त्यामुळे खेळपट्टीची काळजी करण्याची गरज नाही.”

हेही वाचा: IND vs AUS 1st Test: हीच ती वेळ! भारताच्या दोन धुरंदारांना मिळाली ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्याची संधी, नाणेफेकीचा कौल कांगारूंच्या बाजूने

भारतीय कर्णधाराला हे देखील विचारण्यात आले होते की चेंडू खूप वळत असताना तो कसा फलंदाजी करेल कारण त्याचे अनेक सहकारी चांगल्या फिरकी गोलंदाजीसमोर कमकुवत आहेत. “जेव्हा चेंडू खूप फिरतो तेव्हा तुमचा दृष्टिकोन, तुमची तयारी, तुमची धावा काढण्याची पद्धत खूप महत्त्वाची ठरते. जेव्हा तुम्ही अशा खेळपट्ट्यांवर खेळता तेव्हा प्रतिआक्रमण करण्याची पद्धतही महत्त्वाची असते. अशा प्रकारे तुम्ही धावा कराल. फिरकीपटू हुशार आहेत, विरोधी कर्णधार हुशार आहेत. त्यांनी मैदान सरळ केले, त्यामुळे इतक्या सहजासहजी चौकार मारणे शक्य नाही. तुम्हाला अधिक चांगले करावे लागेल. स्ट्राइक फिरवा आणि तुम्ही कोणत्या प्रकारे धावा करू शकता ते पहा.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 10:40 IST
Next Story
WTC Final 2023: आयसीसीकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल मोठी अपडेट; ‘या’ तारखेला खेळला जाणार अंतिम सामना