India vs Australia 1st ODI, Virat Kohli Wicket: पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी ८ महिन्यांनंतर पुनरागमन करणार होते. पण पुनरागमनात ही जोडी पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. रोहित शर्मा ८ तर विराट कोहली शून्यावर माघारी परतला आहे.

ऑस्ट्रेलिया दौरा हा विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण या दोघांना २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळायचा असेल, तर दोघांनाही आपली फिटनेस आणि फॉर्म सिद्ध करावा लागणार आहे. वर्ल्डकपला अजूनही २ वर्ष शिल्लत आहेत. तोपर्यंत एकच फॉरमॅट खेळून फलंदाजीतील सातत्य कायम ठेवणं हे मुळीच सोपं नाही. रोहित आणि विराटने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे दोघे केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहेत.

पुनरागमनात रोहित- विराट फ्लॉप

पुनरागमनातील सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी फ्लॉप ठरली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी डावाची सुरूवात करण्यात आली. रोहितने सावध सुरूवात केली. पण चौथ्या षटकात त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं. जोश हेजलवूडने टाकलेला चेंडू बॅटची कडा घेऊन दुसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या रेनशॉच्या हातात गेला. त्यामुळे रोहितला अवघ्या ८ धावांवर माघारी परतावं लागलं.

विराटला बाद करण्यासाठी कूपर कॉनलीचा भन्नाट झेल

ऑस्ट्रेलियात वनडे क्रिकेट खेळताना विराट कोहलीने दमदार कामगिरी केली आहे. आजवर ऑस्ट्रेलियात वनडे क्रिकेट खेळताना तो एकदाही शून्यावर बाद झाला नव्हता. या डावात फलंदाजी करताना त्याने सुरुवातीचे काही चेंडू खेळून काढले. पण पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्याला बाद करण्यासाठी कूपर कॉनलीने पॉइंटला डाईव्ह मारून भन्नाट झेल घेतला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराट बाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो अनेकदा अशा चेंडूवर बाद होऊन माघारी परतला आहे.