भारत आणि बांगलादेश संघांत तिसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना, ८ बाद ४०९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर बांगलादेश संघाला विजयसाठी ४१० धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात विराटने शतक आणि इशानने द्विशतक झळकावून डावात महत्वाची भूमिका निभावली. तसेच विराट कोहलीने शतक झळकावून अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात विराटने ९१ चेंडूचा सामना करताना, ११ चौकार आणि २ षटकार लगावत ११३ धावा केल्या. कोहलीने ४० महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. या शतकी खेळीसह कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. विराट कोहलीचे हे वनडे कारकिर्दीतील ४४ वे शतक झळकावले आहे. त्याचबरोबर कोहली सध्या सक्रिय असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावणार खेळाडू आहे.

सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारे खेळाडू:

विराट कोहली – ७२
जो रूट – ४४
डेव्हिड वॉर्नर – ४४
स्टीव्ह स्मिथ – ४१
रोहित शर्मा – ४१

रिकी पाँटिंगला टाकले मागे –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहलीने रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. हे त्याचे ७२ वे आंतरराष्ट्रीय शतक आहे, तर पाँटिंगच्या नावावर ७१ शतके आहेत. कोहलीने हा पराक्रम आपल्या ५३६व्या डावात केला आहे.

सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे –

कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४४ शतके करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. सचिनने ४१८ डावांमध्ये ४४ एकदिवसीय शतके पूर्ण केली होती, तर कोहलीने यासाठी केवळ २५६ डाव घेतले आहेत. या फॉरमॅटमध्ये शतकांच्या बाबतीत फक्त तेंडुलकर (४९ शतके) कोहलीच्या पुढे आहे.

धोनी-रोहित आणि राहुलचा विक्रम मोडला –

कोहलीने बांगलादेशच्या भूमीवर १००० एकदिवसीय धावा देखील पूर्ण केल्या आहेत. तसेच असे करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. यासह कोहलीने एमएस धोनी, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांचा सर्वाधिक देशांत १००० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम मोडला. बांगलादेश हा चौथा देश आहे जिथे कोहलीने एकदिवसीय सामन्यात १००० धावा केल्या आहेत. धोनी-रोहित आणि राहुल यांनी तीन देशांमध्ये १००० वनडे धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs BAN 3rd ODI: विराट कोहलीने शतक झळकावत रिकी पॉंटिंगचा ‘हा’ विक्रम काढला मोडीत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –

१०० – सचिन तेंडुलकर (भारत)
७२ – विराट कोहली (भारत)
७१ – रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
६३ – कुमार संगकारा (श्रीलंका)
६२ – जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)