India vs England 3rd Test: लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चुकीचा ठरवत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला सुरूवातीलाच मोठे धक्के दिले. पण त्यानंतर जो रूट आणि ओली पोपने मिळून शतकी भागीदारी केली आणि इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहोचवलं. दरम्यान ध्रुव जुरेलने यष्टीरक्षण करताना भन्नाट झेल घेत ही भागीदारी मोडून काढली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रूट – पोपची शतकी भागीदारी

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेटची जोडी मैदानावर आली. या जोडीला चांगली सुरूवात करून देता आली नाही. नितीश कुमार रेड्डीने आपल्या पहिल्याच षटकात या दोघांनाही बाद करत माघारी धाडलं. बेन डकेट अवघ्या २३ धावांवर माघारी परतला. तर जॅक क्रॉली अवघ्या १८ धावांवर माघारी परतला. इंग्लंडला ४३ धावांवर पहिला धक्का बसला. तर ४४ धावांवर दुसरा धक्का बसला. त्यानंतर रूट आणि पोपने मिळून शतकी भागीदारी केली.

ध्रुव जुरेलचा भन्नाट झेल

तर झाले असे की, भारतीय संघाकडून ५० वे षटक टाकण्यासाठी रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला. ओली पोप आणि जो रूट यांची जोडी चांगलीच जमली होती. दोघांनी मिळून १०० धावांची भागीदारी केली होती. जडेजाच्या षटकातील पहिलाच चेंडू टप्पा पडून खूप जास्त वळला आणि बॅटची कडा घेत यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या हातात गेला. जडेजाने टाकलेला हा चेंडू वेगाने आला, पण ध्रुव जुरेलने चूक न करता झेल घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऋषभ पंत बाहेर, ध्रुव जुरेलला यावं लागलं मैदानात

या सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण ऋषभ पंतला मैदान सोडून बाहेर जावं लागलं आहे. ऋषभ पंतच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून ध्रुव जुरेल यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात आला आहे.