भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) भारत आणि इंग्लंडदरम्यान मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिलीय. भारतीय संघातील भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे खेळाडूंनाही करोना संसर्गाचा धोका असल्याने कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या कसोटीसंदर्भात गुरुवारी आणि शुक्रवारी सविस्तर चर्चा करुन सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. दोन्हीकडील अधिकाऱ्यांमध्ये सामन्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर सामन्याला अगदी काही तास शिल्लक असताना केलेल्या चर्चेनंतर करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो या भीतीने सामना रद्द करण्यात आलाय. यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांकडून क्रिकेट चाहते आणि सामन्याशी संबंधित इतर सहकाऱ्यांची माफीही मागण्यात आलीय. भारतीय संघामधील सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती असल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे असं ईसीबीने स्पष्ट केलंय. भारतीय संघ मैदानामध्ये उतरु शकत नाही असा उल्लेखही ईसीबीच्या अधिकृत पत्रकामध्ये आहे. तसेच सामना रद्द झाला असला तरी मालिका बरोबरीमध्ये सुटणार की भारताकडे चषक दिला जाणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

सोमवारपर्यंत परमामार यांच्यासोबत होते खेळाडू

गुरुवारी भारतीय संघातील खेळाडूंची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये संघातील अनेक खेळाडूंनी पाचवा कसोटी सामना न खेळण्याच्या बाजूने मत नोंदवलं होतं. द इंडियन एक्सप्रेसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रिमियर लिगचं उर्वरित पर्व खेळवलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर खेळाडू संसर्गाच्या भीतीने खेळण्याबद्दल फारसे उत्साही नसल्याचं म्हटलं आहे. करोना पॉझिटीव्ह आलेले फिजिओ परमार हे रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शामी, इशांत शर्मा यासारख्या खेळाडूंसोबत काम करत होते. सोमवारी संपलेल्या कसोटीसामन्यापर्यंत परमार या खेळाडूंसोबतच होते.

संसर्ग झाल्यास…

भविष्यामध्ये काय होणार आहे यासंदर्भात खेळाडूंच्या मनात भीती आहे. करोना संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणं दिसण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो ही सुद्धा चिंता खेळाडूंच्या मनात असल्याचं चर्चेदरम्यान दिसून आलं. भविष्यामध्ये एखाद्या खेळाडूच्या माध्यमातून संसर्ग झाल्यास आयपीएलमधील सहभाग आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकामध्ये खेळण्यासंदर्भात अडचणी निर्माण होतील असं खेळाडूंना वाटत आहे.

आधीच बसलाय करोनाचा फटका…

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांच्यानंतर परमार यांना करोनाची लागण झाल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारचे सराव सत्र रद्द करावे लागले. संघामधील सर्व खेळाडूंच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या. सावधगिरी म्हणून भारतीय चमूला आपापल्या खोलीत थांबण्याचे निर्देश देण्यात आले होते.  शास्त्री यांच्या संपर्कातील भारताचे मुख्य फिजिओ नितीन पटेल सध्या विलगीकरणात असल्यामुळे पाचव्या कसोटीस संघासोबत फिजिओ नसेल. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधरसुद्धा विलगीकरणात असून, फक्त फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड संघासोबत आहेत. सर्व खेळाडू आणि मार्गदर्शकांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी इंग्लंडमध्ये जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे दोन्ही संघांमधील खेळाडू सध्या जैव-सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नाहीत. लंडनमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शास्त्री यांना करोनाची लक्षणे आढळून आली आहेत. या कार्यक्रमाला अरुण, पटेल आणि श्रीधर यांनीही हजेरी लावली होती.

ईसीबीने केली होती अजब मागणी?

एकीकडे भारताला खेळण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं जात असतानाच दुसरीकडे याच्या अगदी उलट दावेही केला जात आहेत. संघात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची (ईसीबी) मागणी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने फेटाळून लावल्याचं सांगण्यात येत आहे.. शास्त्री, अरुण आणि परमार यांना करोनाची लागण झाल्याने भारताचे सर्व खेळाडू सध्या विलगीकरणात आहेत. त्यामुळे भारताने जोखीम पत्करून कसोटी खेळण्याऐवजी इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी मागणी ‘ईसीबी’च्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचं सांगण्यात येतं. मात्र रोहित-विराट यांनी त्यांचा डाव उधळून लावलाय. याशिवाय, २०२२ मधील मर्यादित षटकांच्या मालिकेवर याचे विपरित परिणाम होतील, असेही भारतीय संघ व्यवस्थापनाने ‘ईसीबी’ला कळवल्याचे समजते. पाचवी कसोटी रद्द झाली, तर भारत २-१ अशा फरकाने मालिका जिंकेल. मात्र भारताने स्वत:हून पराभव मान्य केल्यास इंग्लंड मालिकेत २-२ अशी बरोबरी साधेल आणि पतौडी करंडक त्यांच्याकडेच कायम राखला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng manchester test fifth test between england and india cancelled scsg