Virat Kohli on Asif Shaikh: आशिया चषकात टीम इंडियाचा दुसरा सामना नेपाळशी खेळला गेला त्यात भारताने १० गडी राखून विजय संपादन केला. पल्लिकले येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पहिल्या १० षटकांमध्ये हा निर्णय चुकीचा ठरेल असे वाटत होते, कारण गोलंदाजांनी १० षटकात ६५ धावा दिल्या आणि खराब क्षेत्ररक्षणही केले. ३ सोपे झेल सोडले आणि ते झेल सोडणारे खेळाडू होते श्रेयस अय्यर, विराट कोहली आणि इशान किशन. सामन्यानंतर भारतीय संघाने नेपाळच्या काही खेळाडूंना विशेष मेडल देऊन सन्मान केला. त्यात विराट कोहलीला नेपाळचा खेळाडू आसिफ शेखकडून मेडलच्या बदल्यात मेडल हवे होते. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेपाळ क्रिकेट संघाने यंदाच्या आशिया चषकात पदार्पण केले. मात्र, रोहित पौडेलच्या नेतृत्वाखालील नेपाळ संघाने सध्या सुरु असलेल्या आशिया चषक २०२३ मध्ये पहिले दोन्ही सामने गमावले, ज्यामुळे ते सुपर फोरसाठी पात्र ठरू शकले नाहीत. आशिया चषक २०२३ मधील नेपाळचा प्रवास टीम इंडियाविरुद्ध दहा गडी राखून पराभवाने संपला, पण त्यांना पाकिस्तान आणि भारतासारख्या बलाढ्य संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे. या सामन्यात नेपाळचा सलामीवीर आसिफ शेखने अप्रतिम क्रिकेट खेळले आणि भारताच्या भक्कम गोलंदाजीविरुद्ध अर्धशतक झळकावले, जे त्याच्या खूप काळ स्मरणात राहील.

आसिफ शेखला विराट कोहलीसोबतची भेट आठवली

भारताचा माजी कर्णधार आणि शानदार फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने या भारत विरुद्ध नेपाळ सामन्याच्या दुसऱ्याच षटकात आसिफ शेखचा झेल सोडला, ज्यामुळे त्याला खूप मोठे जीवदान मिळाले. त्याचा फायदा शेखने घेत शानदार अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, सामना संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने आसिफ शेखसह नेपाळी क्रिकेटपटूंना पदके दिली. त्यात विराट कोहलीच्या हस्ते देखील एक पदक देण्यात आले.

विराट कोहलीने नेपाळच्या सलामीवीर आसिफ शेखला पदक दिले. यावेळी भारताचा सुपरस्टार विराटने गंमतीने त्याला म्हटले की, “मलाही तुझ्याकडून पदक हवे आहे कारण, मी तुझा झेल सोडला होता.” त्यानंतर एकच हशा पिकला. आपल्या अनुभवाविषयी बोलताना आसिफ पुढे म्हणाला की, “विराट कोहलीने त्याला गंमतीने सांगितले की, मलाही पदक मिळाले पाहिजे, मी तुझा झेल सोडला होता. मात्र, विराट खूप मोठे खेळाडू असून त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.”

विराट कोहलीने आसिफ शेखचा झेल घेत इतिहास रचला

वास्तविक नेपाळविरुद्ध विराट कोहलीने आसिफचा झेल सोडला होता मात्र, यानंतर किंग कोहलीने डावाच्या ३०व्या षटकात एका हाताने आसिफ शेखचा झेल घेतला. विराट कोहलीचा हा एकदिवसीय क्रिकेटमधील १४३वा झेल होता. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या बाबतीत त्याने न्यूझीलंडचा माजी क्रिकेटर रॉस टेलरला मागे टाकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेचे नाव आघाडीवर आहे, ज्याने ४४८ सामन्यांमध्ये २१८ झेल घेतले आहेत.

हेही वाचा: IND vs PAK: भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका पुन्हा सुरू होणार? BCCI अध्यक्षांनी केलं मोठं विधान; म्हणाले, “यावर निर्णय…”

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू

महेला जयवर्धनेने ४४८ सामन्यात २१८ झेल घेतले

रिकी पाँटिंगने ३७५ सामन्यात १६० झेल घेतले

मोहम्मद अझरुद्दीनने ३३४ सामन्यात १५६ झेल घेतले

विराट कोहलीने २७७ सामन्यात १४३ झेल घेतले

रॉस टेलरने २३६ सामन्यात १४२ झेल घेतले

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nep virat kohli wants a medal from asif sheikh in exchange for a medal video from the dressing room went viral avw