Aisa Cup 2025 Terms, hashtags used during this Asia Cup regarding India vs Pakistan: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सामन्यांपेक्षा भारत आणि पाकिस्तान संघांमधील वादामुळे नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारा असेल. भारत आणि पाकिस्तानचे संघ ४१ वर्षांत पहिल्यांदाच आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भिडणार आहेत. यापूर्वी गट टप्प्यात आणि सुपर फोर फेरीत दोन्ही संघ भिडताना दिसले होते. दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता.
या दोन्ही सामन्यांदरम्यान अनेक वाद, घटना पाहायला मिळाले. या वादांमुळे सोशल मीडियावर विविध हॅशटॅग आणि घटना व्हायरल झाल्या होत्या. भारत-पाकिस्तान सामन्यांदरम्यान कोणकोणते विषयांवर चर्चा झाली होती.
बॉयकॉट भारत-पाकिस्तान
आशिया चषकात तर सुरूवातीला भारत आणि पाकिस्तान सामना खेळवला जाऊ नये अशी चाहत्यांची मागणी होती. त्यामुळे आशिया चषकातील भारत पाकिस्तान सामन्यावर बंदी असा हॅशटॅग सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे गट टप्प्यातील पहिला सामना बऱ्याच क्रिकेट चाहत्यांनी पाहिला नव्हता. पण सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरूद्धचा विजय पहलगाम हल्ल्यातील मृत व्यक्तींच्या कुटुंबाना आणि भारतीय लष्कराला समर्पित केल्यानंतर चाहत्यांचा राग निवळला.
हस्तांदोलन वाद
भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी सामन्यानंतर आणि नाणेफेकीदरम्यान हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानविरूद्ध सामना जिंकल्यानंतर भारताचे सर्व खेळाडू थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले होते. यानंतर फार मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता. पहलगाम हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया चषक सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी घेतलेल्या या निर्णयाचं चाहत्यांनी कौतुक केलं.
हारिस रौफचं ६-० हातवारे
पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफने भारताविरूद्ध सुपर फोरमधील सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान ६-० अशी हाताने खूण करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर केलं आणि पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उद्धवस्त केले. ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान, पाकिस्तानी सैन्याने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला. या व्हायरल व्हिडिओमध्ये हरिस रौफ हेच सांगत आहेत, की आम्ही तुमची ६ विमानं पाडली.
बंदूक सेलिब्रेशन
भारताविरूद्ध सुपर फोर सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याने अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकी खेळीनंतर त्याने बॅटची बंदूक करत गोळीबार करत असल्याचं सेलिब्रेशन केलं. सध्याची दोन्ही देशांमधील स्थिती पाहता फरहानचं हे सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरलं.
हारिस रौफ प्लेन क्रॅश
हारिस रौफने सराव सत्रादरम्यान केलेले ६-० चे हातवारे भारताच्या सामन्यादरम्यान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना केले होते. याशिवाय हारिसने प्लेन क्रॅश झाल्याचे हातवारेदेखील सातत्याने केले. भारताच्या चाहत्यांनीही मागून विराट कोहली विराट कोहलीचे नारे देत त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. हारिस रौफवर सामन्यादरम्यान केलेल्या या हातवाऱ्यांमुळे आयसीसीने दंडात्मक कारवाई केली.
सूर्यकुमार यादवचं भारत-पाकिस्तान रायव्हलरी नाही वक्तव्य
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्वंद उरलं नसल्याचं मोठं वक्तव्य पत्रकार परिषदेदरम्यान केलं होतं. सूर्यकुमार यादव म्हणाला होता, “खरंतर मला या प्रश्नावर एक सांगायचं आहे की, तुम्ही या ‘रायव्हलरी’बाबत प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे. कारण, जर दोन संघ १५-२० सामने खेळलेत आणि स्कोअरलाइन ७-७ किंवा ८-७ अशी असेल, तर त्याला रायव्हलरी म्हणता येईल. पण जर स्कोअरलाइन १०-१ किंवा १३-० अशी असेल, मला नक्की आकडा माहित नाही हा… तर मग ती रायव्हलरीच उरत नाही.” सूर्याचा हा पत्रकार परिषदेतील व्हीडिओ व्हायरल झाला होता.