IND vs SA 4th T20 Result : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा टी २० आंतरराष्ट्रीय सामना आज (१७ जून) राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झाला आहे. भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर हा सामना जिंकला. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ८२ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी दोन सामने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने आणि दोन सामने यजमान भारताने जिंकले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने दिलेल्या १७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाची भारतीय गोलंदाजांनी दांडीगुल केली. भारतीय गोलंदाजांच्या सातत्यपूर्ण माऱ्यापुढे आफ्रिकन फलंदाजांनी सपशेल माना टाकल्या. क्विटंन डी कॉक(१४), रॉसी व्हॅन डेर डुसेन (२०) आणि मार्को यान्सन (१२) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताच्यावतीने आवेश खानने चार आणि युझवेंद्र चहलने दोन बळी मिळवले. तर, हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

त्यापूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण मिळाले होते. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या दुसऱ्याच षटकात सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर, तिसऱ्या षटकात श्रेयस अय्यर चार धावा काढून बाद झाला. ईशान किशनने चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण, तोदेखील २७ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि उपकर्णधार हार्दिक पंड्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. फटकेबाजी करण्याच्या नादात कर्णधार पंत १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकने पंड्यासोबत भारतीय डाव चांगल्या स्थितीत नेऊन ठेवला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्या ४६ धावा करून बाद झाला. पंड्या बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील आपले पहिलेवहिले अर्धशतक पूर्ण केले. कार्तिकने २७ चेंडूत ५५ धावा केल्या. पंड्या आणि कार्तिकच्या फटकेबाजीमुळे भारताने निर्धारित २० षटकांमध्ये सहा बाद १६९ धावांपर्यंत मजल मारली.

पाच सामन्यांच्या मालिकेतील ‘करो या मरो’चा सामना जिंकून भारताने मालिकेतील आपले आव्हान टिकवून ठेवले आहे. या दोन्ही संघादरम्यानचा पाचवा आणि निर्णायक सामना १९ जून (रविवार) रोजी बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 4th t20 result india beat south africa by 82 runs vkk