India vs Sri Lanka 1st ODI Match Updates: भारत आणि श्रीलंका संघांत खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीत खेळला जातोय. या सामन्यात भारतीय संघाता माजी कर्णधार विराट कोहलीकडे अनेक विक्रम करण्याची संधी आहे. तो या सामन्यात कॅप्टन कूल एमएस धोनीचा एक विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे.

भारताकडून श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्यात सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे. सचिनने १९९० ते २०१२ दरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या ८४ सामन्यांच्या ८० डावांमध्ये ४३.८४च्या सरासरीने एकूण ३११३ धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये ३००० हून अधिक धावा करणारा सचिन हा भारताचा एकमेव फलंदाज आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र आजपासून सुरू होणाऱ्या मालिकेत विराट कोहलीला धोनीच्या पुढे जाण्याची सुवर्णसंधी असेल. धोनीने २००५ ते २०१९ दरम्यान श्रीलंकेविरुद्ध ६७ सामन्यांच्या ५३ डावांमध्ये ६४.४०च्या जोरदार सरासरीने एकूण २३८१ धावा केल्या आहेत. धोनीने श्रीलंकेविरुद्ध दोन शतके आणि १९ अर्धशतके झळकावली आहेत. दुसरीकडे, जर आपण तेंडुलकरबद्दल बोलायचे तर त्याने श्रीलंकेविरुद्ध ८ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा – IND vs SL 1st ODI: सचिन तेंडुलकरच्या ‘या’ विश्वविक्रमावर विराट कोहलीची असणार नजर; श्रीलंकेविरुद्ध करू शकणार का कमाल?

आता विराट कोहलीबद्दल बोलूया. विराटने २००८ ते २०१९ दरम्यान श्रीलंकेविरुद्ध २२२० वनडे धावा केल्या आहेत. कोहलीने श्रीलंकेविरुद्ध ४७ सामन्यांच्या ४६ डावांमध्ये ६० च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध ८ शतके आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत. सचिन, धोनी आणि विराट हे तीन भारतीय फलंदाज आहेत, ज्यांनी श्रीलंकेविरुद्ध २००० हून अधिक वनडे धावा केल्या आहेत.