Rohit Sharma 3rd Indian captain loss bilateral ODI series against Sri Lanka : भारतीय संघाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ११० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासह भारतीय संघाने वनडे मालिका ०-२ ने गमावली आहे. टीम इंडियाचे गोलंदाज आणि फलंदाज तिसऱ्या वनडेत चांगली कामगिरी करू शकले नाहीत. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लंकन संघाने भारताला विजयासाठी २४९ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात टीम इंडिया अवघ्या १३८ धावांवर गारद झाली. भारतीय संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही. ज्यामुळे टीम इंडिया आणि रोहित शर्माच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.

लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीत रोहित शर्माचा समावेश –

टीम इंडियाने मालिका गमावल्याने कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. श्रीलंकेविरुद्ध द्विपक्षीय वनडे मालिका गमावणारा तो तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर (१९९७) आणि मोहम्मद अझरुद्दीन (१९९३) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने लंकेविरुद्धची द्विपक्षीय वनडे मालिका गमावली होती. भारताने शेवटची एकदिवसीय मालिका सचिन तेंडुलकरच्या नेतृत्त्वाखाली १९९७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध गमावली होती. यानंतर २७ वर्षांनी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने नकोसा विक्रम केला आहे.

टीम इंडियाची खराब फलंदाजी –

श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत भारताचे बहुतांश फलंदाज फ्लॉप ठरले आहेत. रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. त्याने २० चेंडूत ३५ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि १ षटकार लगावला. वॉशिंग्टन सुंदर ३० धावा करून बाद झाला. शुबमन गिल ६ धावा करून बाद झाला. विराट कोहली २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने १८ चेंडूंचा सामना केला आणि ४ चौकार मारले. ऋषभ पंत अवघ्या ६ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यर ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अक्षर पटेल २ धावा करून बाद झाला तर रियान पराग १५ धावा करून बाद झाला. श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालगेने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ५.१ षटकात २७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तिक्षाना आणि व्हँडरसे यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – Vinesh Phogat Disqualified : ‘संपूर्ण देश तुमच्या पाठीशी…’, विनेश-निशासाठी पोस्ट करत सचिन तेंडुलकरही झाला भावूक, पाहा काय म्हणाला

श्रीलंकेसाठी फर्नांडोची दमदार कामगिरी –

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५० षटकांत ७ गडी गमावून २४८ धावा केल्या. यावेळी अविष्का फर्नांडोने शानदार फलंदाजी केली. त्याने १०२ चेंडूंचा सामना करत ९६ धावा केल्या. अविष्का फर्नांडोने ९ चौकार आणि २ षटकार मारले. पथुम निसांकाने ४५ धावांची खेळी साकारली. त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. कुसल मेंडिसने ५९ धावांची खेळी केली. त्याने ४ चौकार मारले. शेवटी कामिंदू मेंडिसने नाबाद २३ धावा केल्या. समरविक्रमा शून्यावर बाद झाला. भारताकडून रियानने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ९ षटकात ५४ धावा दिल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने १० षटकात ३६ धावा देत १ विकेट घेतली. वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज यांनाही १-१ विकेट मिळाली. अक्षर पटेललाही यश मिळाले.