भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी वेस्ट इंडिजचा डाव भारतीय गोलंदाजांनी १६२ धावांवर संपवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाने २ गडी बाद १२१ धावा केल्या आहेत. केएल राहुल ५३ धावा करून नाबाद आहे. पण त्याचं अर्धशतक पूर्ण झालंच नसतं. वेस्ट इंडिजने त्याला बाद करण्याची सोपी संधी हातून घालवली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

या सामन्यात वेस्टइंडिजचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिजचा संपूर्ण डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराहने ३, कुलदीप यादवने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ गडी बाद केला.

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, वेस्ट इंडिजची गोलंदाजी सुरू असताना, फिरकी गोलंदाज पिएरे गोलंदाजी करत होता. त्यावेळी डावखुऱ्या हाताचा फलंदाज साई सुदर्शन स्ट्राईकवर होता. साई सुदर्शनने हा चेंडू लेग साइडच्या दिशेने ढकलला आणि चेंडूकडे पाहता राहिला आणि धाव घेण्यासाठी पुढे आला. नॉन स्ट्राईकला असलेला केएल राहुल एक धाव घेण्यासाठी धावला. राहुल अर्ध्या क्रीझपर्यंत पोहोचला होता.

त्यावेळी साई सुदर्शनने त्याला माघारी जायला सांगितलं. पण केएल राहुल खूप पुढे आला होता. त्यामुळे साई सुदर्शनने नॉन स्ट्राईकच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर दोघेही एकाच दिशेने धावत होती. शेवटी साई सुदर्शनने पुन्हा माघारी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघंही बाद होण्यापासून थोडक्यात बचावले. ही चूक भारतीय संघाला चांगलीच महागात पडली असती.

या सामन्यात भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालने दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून ६८ धावा जोडल्या. यशस्वी जैस्वाल ३६ धावा करून माघारी परतला. तर केएल राहुल ५३ धावांवर नाबाद आहे. तर साई सुदर्शन अवघ्या ७ धावा करत माघारी परतला. तर कर्णधार शुबमन गिल १८ धावांवर नाबाद आहे.