IND vs WI 1st Test Updates in marathi: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला कसोटी आज २ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या सामन्यासह गिल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर पहिल्यांदाचं संघाचं नेतृत्त्व करत आहे. पण १५ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय संघामध्ये मोठा बदल दिसत आहे.

वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटी सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया घरच्या मैदानावर गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करत आहे. या सामन्याासाठी भारतीय संघ ३ फिरकीपटू २ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थिती ध्रुव जुरेलकडे यष्टीरक्षकाची भूमिका आहे.

भारताचे अंतिम ११ म्हटले की विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवीचंद्रन अश्विन यांचं नाव संघात असणं अगदी स्वाभाविक पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेच्या निमित्ताने तब्बल १५ वर्षानंतर पहिल्यांदाच या त्रिकुटापैकी कोणीही अंतिम संघात नसेल. एकप्रकारे भारतीय संघासाठी दसऱ्याला सुरू होणारा हा सामना नव्या शिलेदारांच्या संघाचा आहे. शुबमन गिलकडे या नव्या संघाची कमान आहे.

भारतीय संघ १५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या तीन दिग्गजांशिवाय कसोटी सामना खेळण्यासाठी उतरला आहे. विराट आणि अश्विन दोघांनीही २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तर रोहितला २०१३ मध्ये कसोटी कॅप मिळाली होती.

नोव्हेंबर २०१० मध्ये भारताने अहमदाबाद इथे न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळला होता. त्या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, रवीचंद्रन अश्विन यांच्यापैकी कोणीही नव्हतं कारण तेव्हा या तिघांनीही कसोटी पदार्पण केलं नव्हतं. या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाने वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर आयपीएल झालं. नोव्हेंबर २०१० मध्ये झालेल्या या सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर भारताचे सलामीवीर होते. तिसऱ्या क्रमांकावर द वॉल अर्थातच राहुल द्रविड आणि चौथ्या स्थानी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळला. पाचव्या क्रमांकावर व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण तर सहाव्या क्रमांकावर सुरेश रैना फलंदाजीला आला होता. महेंद्रसिंग धोनी कर्णधार आणि यष्टीरक्षक होता. प्रग्यान ओझा आणि हरभजन सिंग भारतीय संघातले फिरकीपटू होते तर श्रीसंत आणि इशांत शर्मा यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी होती.

योगायोग म्हणजे गंभीर आता भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत तर द्रविड यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने टी२० वर्ल्डकपचं जेतेपद पटकावलं. लक्ष्मण यांच्याकडे नॅशनल क्रिकेट अकादमीची धुरा आहे. प्रग्यान ओझा यांचा काही दिवसांपूर्वीच निवड समितीत समावेश झाला आहे.

२०११ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात विराट कोहलीने भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केलं. अद्भुत अशा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे विराटला वगळण्याचा प्रश्नच आला नाही. काही महिन्यांपूर्वी विराटने कसोटी प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याच्या नावावर १२३ कसोटीत ४६.८५च्या सरासरीने ९२३० धावा होत्या. यामध्ये ३० शतकं आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. यापैकी प्रदीर्घ काळ विराटने कसोटी संघाचं नेतृत्वही केलं. विराटच्याच कार्यकाळात पाच गोलंदाजांनिशी खेळण्यावर भर दिला गेला.

फेब्रुवारी २०१० मध्ये रोहित शर्मा कसोटी पदार्पण करणार होता. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी सराव करताना रोहितला दुखापत झाली. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्यामुळे विकेटकीपर फलंदाज वृद्धिमान साहाला विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळवण्यात आलं. रोहितला कसोटी पदार्पणासाठी आणखी तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागली. २०१३ मध्ये अखेर रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता इथे कसोटी पदार्पण केलं. पदार्पणाच्या लढतीतच रोहितने शतकी खेळी साकारली. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात रोहित ५-६-७ यापैकी कोणत्याही क्रमांकावर यायचा. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यापासून तो सलामीला येऊ लागला. सलामीला खेळू लागल्यापासून त्याचा दबदबा वाढला. सलामीला येत त्याने मॅरेथॉन खेळी साकारल्या. महत्त्वाचं म्हणजे विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितने कसोटी नेतृत्वपदाची धुरा सांभाळली. रोहित आता कसोटी प्रकारात खेळत नसला तरी त्याची आकडेवारी दमदार अशीच आहे. ६७ कसोटीत रोहितच्या नावावर ४०.५७च्या सरासरीने ४३०१ धावा आहेत. यामध्ये १२ शतकं आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे.

२०११ मध्येच रवीचंद्रन अश्विनने भारतासाठी दिल्ली इथे कसोटी पदार्पण केलं. हरभजन-कुंबळे जोडीची परंपरा अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी सुरू ठेवत दीड दशक प्रतिस्पर्धी खेळाडूंना जेरीस आणलं. अश्विनच्या नावावर १०६ कसोटीत ५३७ विकेट्स आहेत. अश्विनच्या निवृत्तीनंतर त्याची परंपरा सुरू ठेवण्याची मोठी जबाबदारी कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल यांच्यावर आहे. या तिघांनीही या जबाबदारीसाठी तय्यार असल्याचं दाखवून दिलं आहे.