Jemimah Rodrigues Catch Video: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताची युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पण मैदानावर क्षेत्ररक्षण करताना तिने धावा वाचवून मोलाचं योगदान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सामन्यात तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की,तिला महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक का म्हणतात. या सामन्यात तिने हवेत डाईव्ह मारून अविश्वसनीय झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला होता. ऑस्ट्रेलियाला दमदार सुरूवात मिळाली होती. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी विकेट्स काढून देणं फार महत्वाचं होतं. दिप्ती शर्माच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाची अनुभवी फलंदाज बेथ मूनीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण नेमकं त्याचवेळी कव्हरला क्षेत्ररक्षण करत असलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने डाईव्ह मारून भन्नाट झेल घेतला. हा झेल इतका भन्नाट होता की, बेथ मूनीला देखील विश्वास बसत नव्हता. त्यामुळे बेथ मूनीला ८ चेंडूत ४ धावा करून माघारी परतावं लागलं.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३३१ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केली. कर्णधार एलिसा हेलीने एक बाजू धरून ठेवली आणि दमदार शतक झळकावलं. तिने ८४ चेंडूंचा सामना करून १५ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने आपलं शतक पूर्ण केलं. तिने या डावात १४२ धावांची खेळी केली. हे तिच्या वनडे कारकिर्दीतील ६ वे शतक ठरले. तर वर्ल्डकप स्पर्धेतील तिसरे आणि भारतीय संघाविरूद्ध झळकावलेले दुसरे शतक ठरले.
हेली बाद होऊन माघारी परतली. पण तिने बाद होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहोचवलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून लिचफिल्डने ४०, एलिस पेरीने नाबाद ४७, अॅशले गार्डनरने ४५, मॅकग्राने १२ , सोफी मॉलीनेक्सने १८ आणि शेवटी किम गार्थने नाबाद १४ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात एलिस पेरीने षटकार मारून भारतीय संघावर विजय मिळवला.
या धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी पूर्ण जोर लावला. भारतीय गोलंदाजांना हवी तशी सुरूवात करून देता आली नव्हती. पण मधल्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना एन चरणीने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर अमनजोत कौर आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. हा सामना लवकर संपला असता, पण भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये पूर्ण जोर लावला. शेवटी शेवटच्या षटकात पेरीने षटकार मारून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.