India beat UAE by 8 wickets in ACC Emerging Teams Asia Cup 2023: एसीसी मेंस इमर्जिंग टीम्स आशिया कप २०२३ च्या स्पर्धेतील तिसरा सामना भारत अ आणि यूएई अ संघांत सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने यूएईचा ८ गडी राखून पराभव केला. भारतीय संघाकडून कर्णधार यश धुलने चमकदार कामगिरी केली. त्याने नाबाद शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना यूएई अ संघाने ५० षटकांत १७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने २६.३ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले.
भारताकडून निकिन जोसने नाबाद ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा सलामीला आले. मात्र हे दोन्ही फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. सुदर्शनने ८ चेंडूत ८ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्याचबरोबर अभिषेक १९ धावा करून बाद झाला.
यशने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने ८४ चेंडूंचा सामना करत नाबाद १०८ धावा केल्या. यशच्या खेळीत २० चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याचवेळी निकिनने ५३ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या. त्याने ५ चौकार मारले. अशा प्रकारे टीम इंडियाने दणदणीत विजय नोंदवला.
यूएई संघ ५० षटकांत ९ गडी गमावून १७५ धावाच करू शकला. या संघासाठी सलामीवीर आर्यांश शर्माने ४२ चेंडूत ३८ धावा केल्या. या खेळीत आर्यनशने ७ चौकार मारले. कर्णधार वाल्थापा चिदंबरमने १०७ चेंडूत ४६ धावा केल्या. त्याला एकही चौकार लगावता आला नाही. मोहम्मद फराजुद्दीनने ८८ चेंडूत ३५ धावा केल्या. याशिवाय कोणताही खेळाडू जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही.
हेही वाचा – VIDEO: “कायलियन एमबाप्पेचे फ्रान्सपेक्षा भारतात जास्त चाहते”, पीएम मोदींकडून फुटबॉलपटूचे कौतुक
भारताकडून हर्षित राणाने ४ बळी घेतले. त्याने ९ षटकात ४१ धावा दिल्या. नितीश रेड्डीने ५ षटकात ३२ धावा दिल्या आणि २ बळी घेतले. मानव सुथारने १० षटकात २८ धावा देत २ बळी घेतले. आकाश सिंगने ४.३ षटकात १० धावा देत एक विकेट घेतली.