हरमनप्रीत कौरच्या फौजेने रविवारी वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरत इतिहास घडवला. या जेतेपदासह आयसीसीतर्फे आयोजित सर्व स्पर्धांची जेतेपदं पटकावण्याचा विक्रम भारताच्या नावावर नोंदला गेला आहे. सर्वाधिक आयसीसी जेतेपदं पटकावणाऱ्या संघांच्या यादीत भारत आता दुसऱ्या स्थानी आहे.
या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने (१०), महिलांनी (१३), U19 मुलं (४) अशी एकूण २७ जेतेपदं पटकावली आहेत.
भारत आता १५ जेतेपदांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारताच्या पुरुष संघाने ७ स्पर्धांची जेतेपदं पटकावली आहेत. यामध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात पटकावलेला १९८३चा वर्ल्डकप, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात जिंकलेला २०११च्या वर्ल्डकपचा समावेश आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरलं होतं. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात बाजी मारली होती. याव्यतिरिक्त पुरुष संघाने ३ वेळा (२००२, २०१३, २०२५) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे.
महिलांनी रविवारी ऐतिहासिक जेतेपद नावावर केलं. भारताच्या U19 मुलांच्या संघाने ५ जेतेपदं (२०००, २००८, २०१२, २०१८, २०२२) पटकावली आहेत. याच प्रकारात म्हणजे U19 वर्ल्डकपमध्ये भारतीय मुलींनी दोन जेतेपदांची कमाई केली आहे. या वर्ल्डकपचं आयोजन २०२३ पासून सुरू झालं. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होणार आहे. भारताने दोन्ही वेळा जेतेपद पटकावलं आहे.
या यादीत ९ जेतेपदांसह तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा संघ आहे. पाकिस्तानच्या नावावर ५ तर श्रीलंकेच्या नावावर ३ जेतेपदं आहेत.
