आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मैदानावरील खेळापेक्षा, भारत आणि पाकिस्तान या संघांतील खेळाडूंच्या विविध कृती, मैदानाबाहेरील राजकारण याचीच चर्चा अधिक रंगली. या स्पर्धेची सांगताही अतिशय नाट्यमय आणि वादग्रस्त ठरली. स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतरही भारतीय संघाला चषकाविनाच मायदेशी परत यावे लागणार आहे. एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर, नक्वी चषक वितरित न करताच परतल्यामुळे पेच वाढला असून आता याविरोधात बीसीसीआय आयसीसीकडे दाद मागणार आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच रंगलेला भारत-पाकिस्तान वाद रविवारी, चषक वितरण सोहळ्यात टिपेला पोहोचला. विजेत्या भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक घेण्यास नकार दिला. नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष आणि पाकिस्तान सरकारमध्ये अंतर्गत सुरक्षामंत्री म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी अनेकदा भारतविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या हातून आम्ही चषक स्वीकारणार नाही अशी भारतीय संघाची भूमिका होती. भारतीय संघ अमिराती क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष खालिद अल झरूनी यांच्याकडून चषक घेण्यास तयार होता.
मात्र, ‘एसीसी’ अध्यक्ष या नात्याने विजेत्या संघाला चषक मीच देणार, असे नक्वी यांचे म्हणणे होते. भारतीय संघ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नक्वी मैदानातून चालते झाले. मात्र, जाताना ‘एसीसी’च्या पदाधिकाऱ्यांसह चषकही घेऊन गेले. नक्वी यांच्याविरोधात आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) तक्रार नोंदविण्याची भूमिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतली आहे. सध्या आशिया चषक ‘एसीसी’च्या दुबईतील मुख्यालयात ठेवण्यात आल्याचे समजते.
भारतीय चाहत्यांकडून हुर्यो
अंतिम सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा सुरू होण्यास तासभराहून अधिक कालावधी लागला. भारतीय संघ मैदानात असताना पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रूममध्येच बसून राहिले. त्यामुळे ते मैदानात आल्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्यांच्याविरोधात शेरेबाजी केली. नक्वी व्यासपीठावर आली तेव्हाही ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या.
चषकाविना जल्लोष
भारतीय संघाने नकार दिल्यानंतर संतप्त झालेले नक्वी मैदानातून चषकासह निघून गेले. मात्र भारतीय संघाने त्यांना छेडण्याची ही संधीही दवडली नाही. ‘सोहळ्या समाप्ती’च्या घोषणेनंतर भारतीय संघाने हातात ‘चषक’ पकडल्याची कृती करत जल्लोष साजरा केला. यावेळी आतषबाजीही करण्यात आली. भारतीय संघातील खेळाडूंनी ‘चषका’सह छायाचित्रे समाजमाध्यमांवरूनही प्रसारीत केली.
आमच्या देशाविरोधात युद्ध पुकारणाऱ्या व्यक्तीकडून (नक्वी) आम्ही चषक घेणार नाही, अशी आमची ठाम भूमिका होती. मात्र, यामुळे त्या व्यक्तीला चषक आणि पदके आपल्याबरोबर घेऊन जाण्याचा अधिकार मिळत नाही. त्यांची कृती अतिशय निंदनीय आणि बालिश आहे. – देवजीत सैकिया, सचिव, ‘बीसीसीआय’.
खेळांच्या मैदानावरही ‘ऑपरेशन सिंदूर’. अंतिम निकाल तोच – भारत विजयी. आपल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षच विजेत्यांना चषक देतात. त्यांचा तो हक्कच आहे. आता तुम्ही त्यांच्याकडून चषक घेण्यास नकार दिलात, तर तुम्हाला चषक मिळणारच कसा? – सलमान आघा, पाकिस्तानचा कर्णधार.