India vs Australia 1st ODI Match Timings: भारतीय संघातील खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना १९ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. ही मालिका भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय खास असणार आहे. कारण भारतीय संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहेत. दरम्यान हे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या.
भारत- ऑस्ट्रेलिया सामने किती वाजता सुरू होणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबरला पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना २३ ऑक्टोबरला अॅडिलेड आणि मालिकेतील तिसरा सामना २५ ऑक्टोबरला सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे. हे सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होणार आहेत. सामना सुरु होण्याआधी सकाळी ८:३० वाजता नाणेफेक होईल.
विराट- रोहितसाठी अतिशय महत्वाची मालिका
ही मालिका विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा झाल्यानंतर दोघेही पहिल्यांदाच वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. या मालिकेआधी बीसीसीआयने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे. तो शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. जर दोघांना २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळायचं असेल, तर या मालिकेत चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं असणार आहे. ही मालिका झाल्यानंतर दोघेही वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतात, अशी देखील चर्चा रंगली आहे. आता हे दोघं कशी कामगिरी करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल