India vs Australia 2nd T20I Match Details: वनडे मालिका झाल्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना कॅनबरामध्ये पार पडला. या सामन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली . पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. १० व्या षटकात भारतीय संघाने १ गडी बाद ९७ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने हा सामना रद्द करण्यात आला. दरम्यान मालिकेतील दुसरा सामना केव्हा आणि कुठे होणार? जाणून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना केव्हा होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी -२० सामना शुक्रवारी ३१ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:४५ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक १:१५ वाजता होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी -२० सामना कुठे होणार आहे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी -२० सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे स्टार खेळाडू संघात नसतानाही या सामन्याची तिकिटे सोल्डआऊट झाली आहेत.

भारत- ऑस्ट्रेलिया दुसरा टी -२० सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी -२० सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. तसेच हा सामना तुम्ही जिओहॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

दुसऱ्या टी -२० सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची संभावित प्लेइंग ११

शुबमन गिल, सूर्यकुमार यादव ( कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

पहिला सामना पावसामुळे रद्द

या मालिकेतील पहिला सामना कॅनबरामध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी मिळून ३५ धावांची सलामी दिली. अभिषेक शर्मा १९ धावा करत माघारी परतला. त्यानंतर शुबमन गिलने नाबाद ३७ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादव ३९ धावांवर नाबाद राहिला. यासह भारतीय संघाने ९.४ षटकात ९७ धावा केल्या. पण पावसाने हजेरी लावल्याने हा सामना रद्द करण्यात आला.