India vs Bangladesh, Cricket World Cup 2023 : राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यात आज भारतीय संघासमोर बांगलादेशचं आव्हान आहे. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवत भारतीय संघाने चांगली सुरुवात केली आहे. पण बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. कारण १६ वर्षांपूर्वी याच बांगलादेशने भारतीय संघाने वर्ल्डकप विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं.
भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड त्या संघाचे कर्णधार होते. द्रविडसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांचे पडलेल्या चेहर्यांचा फोटो क्रिकेटरसिकांच्या आजही स्मरणात आहे.
२००७ वर्ल्डकपची संरचना वेगळी होती. भारताच्या गटात बर्म्युडा, श्रीलंका, बांगलादेश हे संघ होते. भारताने बर्म्युडावर दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्ध पराभव झाल्याने बांगलादेशविरुद्धचा सामना करो या मरो झाला.
हेही वाचा >> Rohit Sharma: रोहित शर्माचा निष्काळजीपणा; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी पुणे पोलिसांची कारवाई, नेमकं प्रकरण काय?
वेस्ट इंडिजमधल्या पोर्ट ऑफ स्पेन इथल्या क्वीन्स पार्क ओव्हलवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारला पण भारताची वलयांकित फलंदाजी अक्षरक्ष: कोसळली. वीरेंद्र सेहवाग (२), सचिन तेंडुलकर (७), राहुल द्रविड (१४), महेंद्रसिंग धोनी (०) यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. सौरव गांगुलीने ६६ तर युवराज सिंगने ४७ धावांची खेळी केली. बांगलादेशतर्फे मश्रफी मुर्तझाने ४ तर अब्दुर रझ्झाक आणि मोहम्मद रफीक यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना तमीम इक्बाल, मुशफकीर रहीम आणि शकीब उल हसन यांच्या अर्धशतकांच्या बळावर बांगलादेशने ५ विकेट्स राखून खळबळजनक विजय मिळवला. पराभवासह भारतीय संघाचं वर्ल्डकपमधलं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं. मायदेशात याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. क्रिकेटपटूंना तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं.
हेही वाचा >> World Cup 2023: पाकिस्तानच्या तक्रारीवर ICCकडून कारवाई होण्याची शक्यता कमी, जाणून घ्या काय म्हणतात नियम?
बांगलादेशच्या त्या संघातील २ खेळाडू (शकीब उल हसन आणि मुशफकीर रहीम) आजच्या सामन्यात खेळणार आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि बांगलादेश ४ वेळा आमनेसामने आले आहेत. हा अपवाद वगळता अन्य तिन्ही वेळा भारताने बांगलादेशवर विजय मिळवला आहे. भारतीय संघ साखळी फेरीतच गारद झाल्याने वर्ल्डकपचं आर्थिक गणितही विस्कटलं.