Sachin Tendulkar on Handshake Controversy: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिका अनेक कारणांसाठी चर्चेत राहिली. पाचव्या कसोटी सामन्यात भारताने अवघ्या सहा धावांनी इंग्लंडचा पराभव करत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. या मालिकेत अनेक विक्रम मोडीत निघाले, काही नवे विक्रम प्रस्थापित झाले. खेळाबरोबच इतर अनेक प्रसंग मालिकेत गाजले. मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीत हस्तोंदालन वाद उफाळून आला. यावर आता भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
चौथ्या कसोटीत पाचव्या दिवशी भारताचा फलंदाज रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी बहारदार खेळ करत कसोटी सामना वाचवला. सामन्याचा निकाल लागणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने फलंदाजी रोखत सामना संपविण्याची सूचना केली. मात्र रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने ही मागणी धुडकावून लावली. यावर क्रिकेटजगतातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. बेन स्टोक्सने खिलाडूवृत्ती दाखवली नसल्याचाही आरोप करण्यात आला.
‘ती भारताची अडचण नाही’
बेन स्टोक्सची सूचना धुडकावून फलंदाजी करत राहण्याच्या भारताच्या निर्णयाला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आता पाठिंबा दिला आहे. रेडिट या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकरने म्हटले की, इंग्लंडच्या गोलंदाज आणि इतर खेळाडूंना विश्रांती मिळावी म्हणून भारताच्या फलंदाजांनी हात मिळवून खेळ का संपवावा? जर इंग्लंडला हॅरी ब्रुकला गोलंदाजी द्यायची होती तर हा स्टोक्सचा निर्णय होता. ती भारताची अडचण नव्हती.
शतक करण्यात वावगे काय?
सचिन तेंडुलकरने पुढे म्हटले, वॉशिंग्टन आणि रवींद्र जडेजाने शतक लगावले. शतक करण्यात वावगे काय? ते शतकासाठी नाही तर सामना अनिर्णित राखण्यासाठी खेळत होते. जर ते बाद झाले असते तर कदाचित आपण सामना गमावला असता.
इंग्लंडच्या गोलंदाजाना ताजेतवाणे का ठेवावे?
एवढेच नाही तर मँचेस्टरमधील वादाच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकरने पुढे असेही म्हटले की, ओव्हलमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडच्या गोलंदाजांना विश्रांती न देण्याचा भारताचा निर्णय योग्यच होता. मँचेस्टरचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर ओव्हलच्या सामन्यावर मालिका अवलंबून होती. त्यामुळे पाचव्या सामन्यासाठी इंग्लंडच्या गोलंदाजांना विश्रांती का मिळू द्यावी? याचे उत्तर तुमच्याकडे आहे का? तर नाही.
वॉशिंग्टन सुंदरच्या खेळाचेही कौतुक सचिन तेंडुलकरने केले. “सुंदरने अतिशय चांगल्या पद्धतीने आपले योगदान दिले. चौथ्या कसोटीत खेळपट्टीवर थांबण्याची गरज होती, तिथे तो शड्डू ठोकून थांबला. तर पाचव्या कसोटीत वेगाने धावा बनविण्याची आवश्यकता होती, तिथे त्याने धावाही ठोकल्या. शाब्बास वॉशि”, अशा शब्दांत तेंडुलकरने त्याचे कौतुक केले.