Hardik Pandya Runout: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि ओमान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांअखेर १८८ धावा केल्या. यादरम्यान हार्दिक पांड्याला नशिबाची साथ मिळाली नाही. तो आगळ्यावेगळ्या पद्धतीने धावबाद होऊन माघारी परतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ज्या फलंदाजांना सुरवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, अशा फलंदाजांना या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली. हार्दिक पांड्या या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. गेल्या दोन्ही सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. या सामन्यात त्याच्याकडे मनसोक्त फलंदाजी करण्याची संधी होती. पण त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. तो नॉन स्ट्राईकला असताना धावबाद होऊन माघारी परतला.
तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना ओमानकडून ८ वे षटक टाकण्यासाठी जितेन रामानंदी गोलंदाजीला आला. त्यावेळी संजू सॅमसन स्ट्राइकवर होता. रामानंदीने टाकलेल्या चेंडूवर संजूने समोरच्या दिशेने फटका मारला. पण ज्यावेळी फटका मारला त्यावेळी नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज हार्दिक पांड्या धाव घेण्यासाठी पुढे निघाला होता. रामानंदीला झेल घेण्याची संधी होती. पण झेल सुटला आणि चेंडू त्याच्या हाताला लागून यष्टीला जाऊन धडकला. त्यामुळे त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं. हार्दिक पांड्या या डावात १ चेंडू खेळून १ धाव करत माघारी परतला.
भारतीय संघाने केल्या १८८ धावा
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. कर्णधार सूर्यकुमार यादव शेवटपर्यंत फलंदाजीला आला नाही. तरीदेखील भारताने २० षटकात ८ गडी बाद १८८ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून फलंदाजी करताना संजू सॅमसनने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली.
तर सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने ३८ धावा चोपल्या. तर अक्षर पटेलने २६ आणि तिलक वर्माने २९ धावांची खेळी केली. या डावात सर्वांना फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पण सूर्यकुमार यादव शेवटपर्यंत फलंदाजीला आला नाही.