दुबई : फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही आलेल्या अपयशामुळे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी चुरशीच्या लढतीत श्रीलंकेकडून सहा गडी राखून पराभव पत्करावा लागल्याने भारताची पुढील वाट बिकट झाली आहे. श्रीलंकेने मात्र अंतिम फेरीमधील स्थान निश्चित केले आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ बाद १७३ धावा केल्या. श्रीलंकेने १९.५ षटकांत ४ बाद १७४ धावा करून विजय मिळवला. पथुम निसंका आणि कुशल मेंडिस यांच्या अर्धशतकी खेळी श्रीलंकेसाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.
आव्हानाचा पाठलाग करताना निसंका आणि मेंडिस यांनी श्रीलंकेला झकास सुरुवात करून दिली होती. १२व्या षटकात चहलने निसंका आणि असलंका यांना बाद केले. त्यानंतर अश्विनने गुणतिलकाला बाद केले. चहलने आपल्या अखेरच्या षटकात मेंडिसचा अडथळा दूर केला. मात्र, अखेरच्या पाच षटकांत कर्णधार दसून शनाका आणि भानुका राजपक्षे यांनी ३४ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी करून श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. शनाका ३३, तर राजपक्षा २५ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही. मधल्या षटकांत रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी डावाला वेग दिला. राहुल आणि सूर गवसलेला विराट कोहली दोन धावांच्या अंतराने बाद झाले. रोहित आणि सूर्यकुमारने भारताच्या डावाला आधार दिला. पण, फटकेबाजीतील घाई त्याला महागात पडली. रोहितने ४१ चेंडूंत ७२ धावा करताना ५ चौकार आणि ४ षटकार लगावले.
१५ षटकांत गोलंदाजांचे पर्याय संपल्यावर कर्णधार दसून शनाकाने स्वत:कडे गोलंदाजी घेतली आणि हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. शनाकाने प्रथम सूर्यकुमारला (३४) आणि नंतर हार्दिक पंडय़ाला (१७) बाद केले. अखेरच्या पाच षटकांत शनाका आणि चामिका करुणारत्ने यांनी चिवट मारा करून भारताला रोखण्यात यश मिळवले.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ८ बाद १७३ (रोहित शर्मा ७२, सूर्यकुमार यादव ३४; दिलशान मदुशंका ३/२४) पराभूत वि. श्रीलंका १९.५ षटकांत ४ बाद १७४ (पथुम शनाका ५२, कुशल मेंडिस ५७, दसुन शनाका नाबाद ३३, राजपक्षा नाबाद २५, युझवेंद्र चहल ३/३४)
अर्शदीपला सचिनचे पाठबळ
नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर चाहत्यांनी खलनायक ठरवलेल्या अर्शदीप सिंगला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पाठबळ दिले आहे. वैयक्तिक मतांना क्रिकेटपासून दूर ठेवण्याचे आवाहन सचिन तेंडुलकरने चाहत्यांना केले आहे. ‘‘देशासाठी खेळणारा प्रत्येक खेळाडू आपले सर्वस्व बहाल करत असतो. अशा वेळी त्यांना तिरस्काराची नाही, तर प्रोत्साहनाची गरज असते,’’ असे सचिन म्हणाला.
जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया
नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या दुखऱ्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया मंगळवारी यशस्वी पार पडली. ‘‘क्रिकेटच्या मैदानावर लवकर परतण्यासाठी आपण काही दिवसांत पुनर्वसन कार्यक्रमाला सुरुवात करू,’’ असे जडेजाने म्हटले आहे. या कठीण काळात पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्वाचे जडेजाने आभारदेखील मानले आहेत.
आवेशची माघार; चहरचा समावेश
नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज आवेश खानने आजारपणामुळे उर्वरित आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतली आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली. राखीव खेळाडू म्हणून संघासमवेत असलेल्या वेगवान गोलंदाज दीपक चहरचा संघात समावेश करण्यात आला आहे. ताप आणि सर्दीमुळे आवेशला या स्पर्धेतील पुढील सामन्यांत खेळवता येणार नसल्याचे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले.