IND vs WI 2025 Series अहमदाबाद : अतिशय नाट्यमय आणि वादग्रस्त ठरलेल्या आशिया चषक स्पर्धेत जेतेपद पटकावल्याच्या चारच दिवसांत भारतीय संघ आज, गुरुवारपासून मायदेशातील क्रिकेट हंगामाला प्रारंभ करणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजशी गाठ पडणार असून यजमानांचाच वरचष्मा अपेक्षित आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी एरवी फिरकीला अनुकूल मानली जाते. मात्र, आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी ‘हिरवीगार’ खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. अशात वेगवान गोलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाने रविवारी दुबई येथे आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यानंतर सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान कसोटी संघाचा कर्णधार गिल, तसेच प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अहमदाबाद गाठले. गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी गेले दोन दिवस कसून सराव केला. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून गिलची मायदेशात ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे या नव्या अध्यायाची यशस्वी सुरुवात करण्याचा त्याचा मानस आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेचा भाग असल्याने भारताचा दोनही सामने जिंकून अधिकाधिक गुण कमावण्याचा प्रयत्न असेल.

मायदेशातील गेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघावर न्यूझीलंडकडून ०-३ अशी हार पत्करण्याची नामुष्की ओढवली होती. ही मालिका गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाली. त्यानंतर भारतीय संघात मोठे बदल झाले आहेत. तत्कालीन कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या तारांकितांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केले आहे. त्यामुळे आता मायदेशात नव्या दमाचा कसोटी संघ खेळताना दिसेल. भारतीय संघाने गिलच्या नेतृत्वाखाली पहिली कसोटी मालिका काही महिन्यांपूर्वीच इंग्लंडमध्ये खेळली. पाच सामन्यांची ही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडविण्यात भारताने यश मिळवले होते. आता घरच्या मैदानांवर तुलनेने दुबळ्या विंडीज संघाविरुद्ध वर्चस्व राखण्याचा भारतीय संघाचा मानस असेल.

वेळ : सकाळी ९.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.

कर्णधार गिलकडेच लक्ष

कसोटी संघाचा कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच मालिकेत शुभमन गिलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना इंग्लंडमध्ये पाच सामन्यांत तब्बल ७५४ धावा करण्याची किमया साधली. त्यामुळे तो एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला. आता हीच लय मायदेशात राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल. विशेष म्हणजे गिलने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर याआधी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने या मैदानावर कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तीनही प्रारूपांत शतके साकारली आहे. विंडीजची गोलंदाजी कागदावर तितकीशी मजबूत दिसत नसल्याने गिल वर्चस्व राखू शकेल. फिरकीची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरवर असेल. तसेच जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाजही खेळणे अपेक्षित आहे. आता अतिरिक्त गवत असलेली खेळपट्टी लक्षात घेता, गोलंदाजाचा पाचवा पर्याय म्हणून चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला खेळवायचे की प्रसिध कृष्णाच्या रूपात तिसऱ्या वेगवान गोलंदाजाला पसंती द्यायची, असा पेच भारतासमोर आहे.

चेस, होपवर भिस्त

वेस्ट इंडिजने अखेरचा कसोटी सामना मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. प्रकाशझोतात (डे-नाइट) झालेल्या या कसोटीतील दुसऱ्या डावात विंडीजचा संघ अवघ्या २७ धावांत गारद झाला होता. ही त्यांची कसोटी क्रिकेटमधील सर्वांत नीचांकी धावसंख्या ठरली. विंडीजचा संघ गेल्या काही वर्षांपासून अपयशाच्या गर्तेत अडकला असून भारताला ते कितपत झुंज देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विंडीजची भिस्त प्रामुख्याने कर्णधार रॉस्टन चेसवर असेल. ऑफ-स्पिन गोलंदाज आणि प्रतिभावान फलंदाज असलेल्या चेससमोर दोन्ही विभागांत योगदान देण्यासह नेतृत्वात अचूकता राखण्याचे आव्हान असेल. मधल्या फळीत अनुभवी शाय होप कामगिरी उंचवावी लागेल. वेगवान गोलंदाज जेडन सिल्सने अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली असून अहमदाबादच्या हिरव्या खेळपट्टीवर तो प्रभावी ठरू शकेल. फिरकीची जबाबदारी जोमेल वॉरिकन सांभाळेल.

पावसाचे सावट : अहमदाबाद येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीवर पावसाचे सावट आहे. सामन्याचे पहिले तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अखेरचे दोन दिवस वातावरण ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पाचही दिवस २४ ते ३२ अंश सेल्सियमच्या दरम्यान तापमान असेल.

संघ

भारत : शुभमन गिल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), नारायण जगदीशन (यष्टिरक्षक), नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.वेस्ट इंडिज : रॉस्टन चेस (कर्णधार), केव्हलॉन अँडरसन, अलिक अथानाझे, जॉन कॅम्पबल, तेगनारायण चंद्रपॉल, शाय होप (यष्टिरक्षक), टेविन इम्लाच (यष्टिरक्षक), ब्रँडन किंग, जस्टिन ग्रीव्हस, जोहान लेन, खेरी पिएर, जोमेल वॉरिकन, जेडन सिल्स, अँडरसन फिलिप्स, जेदी ब्लेड्स.