हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघासमोर तुल्यबळ ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. भारतीय संघाने तीनपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताला विजयासाठी संघर्ष करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने मात्र भारतावर थरारक विजय मिळवत बाजी मारली. जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मन्धाना आणि हरमनप्रीत कौर या तिघींपैकी एकीला मोठी खेळी करण्याची आवश्यकता आहे. भारतीय संघाला क्षेत्ररक्षणातही अमूलाग्र बदल करावा लागणार आहे. भारतीय संघाला सहाव्या गोलंदाजाचीही आवश्यकता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हाणामारीच्या षटकात सामना भारताच्या हातून निसटला होता. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानेही तीन सामने खेळले आहेत. दोनमध्ये त्यांनी विजय मिळवला तर श्रीलंकेविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाला विजयाची संधी! शेवटच्या १० षटकात इतक्या धावांची गरज

ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. शेवटच्या १० षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५६ धावांची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाचे ३ प्रमुख फलंदाज तंबूत! टीम इंडियाचं दमदार पुनरागमन

ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात मिळाली होती. बेथ मूनी ४ धावांवर तर सदरलँड शून्यावर माघारी परतली आहे.

ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का! लिचफिल्ड परतली माघारी

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात मिळाली होती. पण ८५ धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का बसला. लिचफिल्ड ४० धावा करत माघारी परतली.

ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचं लक्ष्य

स्मृती मन्धाना आणि प्रतिका रावळ यांच्या दमदार खेळींच्या बळावर भारतीय संघाने ३३० धावांचा डोंगर उभारला. स्मृतीने ८० तर प्रतिकाने ७५ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे अनाबेल सदरलँडने ५ विकेट्स पटकावल्या.

टीम इंडियाने ओलांडला तीनशेचा टप्पा

भारतीय संघाने विशाखापट्टणमच्या उष्ण आणि दमट वातावरणातही दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनशेची वेस ओलांडली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या तुल्यबळ संघाला रोखायचं असेल तर मोठी धावसंख्या रचावी लागेल हे स्वाभाविक होतं. ऑस्ट्रेलियाच्या सर्वच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत भारताने तीनशेपार धावसंख्या नोंदवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनशे धावा करणारा भारत हा एकमेव संघ आहे.

ऋचा घोषची फटकेबाजी

मेगन शूट दुखापतग्रस्त झाल्याने ताहिला मॅकग्राने तिचं षटक पूर्ण केलं. या षटकात ऋचा घोषने एक षटकार आणि एक चौकार लगावला. जेमिमाने याच षटकात चौकारही वसूल केला होता. टीम इंडिया मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे.

हरमनप्रीत-हरलीन बाद

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि हरलीन देओल या दोघी ठराविक अंतरात बाद झाल्याने भारतीय संघाची धावगती मंदावली आहे. स्मृती-प्रतिका बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने सूत्रं हाती घेतली होती. दोघीही स्थिरावल्या आहेत असं वाटत असतानाच ऑस्ट्रेलियाने या दोघींना बाद करत पुनरागमन केलं आहे.

ऑस्ट्रेलियाला पहिलं यश; स्मृती झाली बाद

शतकाकडे वाटचाल करणाऱ्या स्मृती मन्धानाला बाद करत ऑस्ट्रेलियाने भारताची सलामीची जोडी फोडली. स्मृतीने ६६ चेंडूत ८० धावांची तडाखेबंद खेळी केली. या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

स्मृती मन्धानाचं अर्धशतक

कॅलेंडर वर्षात १००० धावांचा टप्पा ओलांडण्याचा अनोखा विक्रम नावावर करणाऱ्या स्मृतीने अर्धशतकाचा टप्पा गाठला. सुरुवातीच्या पाच षटकात सावध खेळणाऱ्या स्मृतीने खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं.

स्मृती-प्रतिकाची आश्वासक सुरुवात

स्मृती मान्धना आणि प्रतिका रावळ यांनी ऑस्ट्रेलियाच्या तुल्यबळ आक्रमणासमोर ६ षटकात २३ धावा करत चांगली सुरुवात केली आहे. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये विकेट्स गमावण्याची चूक भारतीय संघाने टाळली आहे.

भारताचा संघ कायम
भारतीय संघात कोणताही बदल नसल्याचं कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्ट केलं. भारतीय संघ- प्रतिका रावळ, स्मृती मन्धाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनज्योत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरानी

ऑस्ट्रेलियाच्या संघात एक बदल
ऑस्ट्रेलियाने जॉर्जिओ वारेहमच्या जागी सोफी मोलिनक्सला संघात समाविष्ट केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ- एलिसा हिली, फोब लिचफिल्ड, एलिसा पेरी, बेथ मूनी, अनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहिला मॅकग्रा, सोफी मॉलिनक्स, किम गरॅथ, अॅलना किंग, मेगन शूट