India vs Pakistan, Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानने भारतीय संघासमोर विजयासाठी १२८ धावांचे ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. शेवटी कर्णधार सूर्यकुमार यादवने षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान सामना झाल्यानंतर भारतीय खेळाडू हात मिळवण्यासाठी देखील बाहेर आलेले नाहीत.

या सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी आले. नाणेफेकीच्या वेळी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार हात मिळवणी करतात. पण या सामन्यात असं काहीच झालं नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव हात न मिळवताच निघून गेला. सामन्याची सुरुवात अशी झाली आणि सूर्याने शेवटही असाच काहीसा केला.

सामना झाल्यानंतर नेमकं काय घडलं?

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२८ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाचा फलंदाजीक्रम पाहता हे आव्हान भारतीय संघासाठी फार मोठं नव्हतं. अभिषेक आणि गिलने दमदार सुरुवात करून दिल्यानंतर शेवटी कर्णधार सूर्यकुमार यादवने षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान विजयानंतर भारतीय फलंदाज हात मिळवण्यासाठी थांबले नाही. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे दोघेही सामना झाल्यानंतर थेट मैदानाबाहेर निघून गेले. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर खेळाडूंनी दरवाजा लावून घेतला.

भारतीय संघाचा विजय

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण सुरुवातीच्या षटकात पाकिस्तानला मोठे धक्के बसले. पाकिस्तानला २० षटकांअखेर ९ गडी बाद १२७ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर हार्दिक पांड्याने १ गडी बाद केला.

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने ३१ धावांची खेळी करून दमदार सुरुवात करून दिली. शुबमन गिलने १० धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव ४७ धावांवर नाबाद राहिला. तर तिलक वर्माने ३१ आणि शिवम दुबेने नाबाद १० धावांची खेळी केली. शेवटी सूर्याने षटकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.