Shubman Gill Discharged From Hospital: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ३० धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला. संघाचा कर्णधार शुबमन गिलच्या मानेला दुखापत झाली, त्यामुळे या सामन्यातून बाहेर पडावं लागलं. आता गिलच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करत असताना गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी वुडलँड्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन गिलची भेट घेतली. दरम्यान रविवारी रात्री गिलला डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती समोर येत आहे. पण गिल दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा निकाल अवघ्या अडीच दिवसात लागला. त्यामुळे भारतीय संघाला गुवाहाटी कसोटीपूर्वी सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघातील खेळाडू मंगळवारी इडन गार्डन्सच्या मैदानावर सराव करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पण गिल सरावासाठी मैदानात उतरणार नसल्याची माहिती समोर येत आहे. गिलला ४ ते ५ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे गिल दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. मालिकेतील दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. भारतीय खेळाडू बुधवारी गुवाहाटीला रवाना होणार आहेत. पण गिल भारतीय संघासोबत जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे.’

भारतीय संघाचा पराभव

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने १८९ धावा केल्या आणि ३० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने १५३ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या ९३ धावांवर आटोपला. यासह दक्षिण आफ्रिकेने हा सामना ३० धावांनी आपल्या नावावर केला.