Team India T20 WC 2024 Triumph Celebration Video: भारतीय संघ २९ जून २०२४ रोजी टी-२० वर्ल्डचॅम्पियन ठरला. भारतीय संघाने वर्ल्डकप विजयाला वर्षपूर्ती झाल्याचं खास सेलिब्रेशन इंग्लंडमध्ये केलं होतं. भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सध्या बर्मिंगहममध्ये आहे. टीम इंडियाने बर्मिंगहममध्ये या विजयाचं सेलिब्रेशन केलं. यादरम्यान टीम इंडियाचे खेळाडू रवींद्र जडेजाला चिडवताना दिसले.
भारतीय संघाने बर्मिंगहममधील टीम हॉटेलमध्ये केक कापत भारताच्या वर्ल्डकप विजयाच्या वर्षपूर्तीचं सेलिब्रेशन केलं. यादरम्यान दोन केक ठेवण्यात आले होते. एका केकवर टीम इंडिया तर दुसऱ्या केकवर चॅम्पियन्स T20 WC 2024 असं लिहिलं आहे. या सेलिब्रेशनसाठी टीम इंडियाचे सर्व खेळाडूही तिथे उपस्थित होते. बीसीसीआयने या सेलिब्रेशनचा व्हीडिओ शेअर केला आहे.
केक नेमकं कोण कापणार, यावर मोठा गोंधळ उडाला होता. टीम इंडियाचे दोन्ही सिनियर खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली तर या दौऱ्यावर नाहीत. त्यामुळे सर्वच जण एकमेकांना पुढे पुढे करत होते. सर्वांनी आधी अर्शदीप आणि सिराजला पुढे केलं. तितक्यात जसप्रीत बुमराहकडे बोट दाखवत एक जण मॅन ऑफ द सिरिज म्हणाला आणि अर्शदीपने त्याला केक कापण्यासाठी पुढे घेतलं. एक केक बुमराहने तर दुसरा केक सिराजने कापला आणि दोघांनीही एकमेकांना भरवला.
केक कापल्यानंतर सर्वच जण एकमेकांना केक भरवत होते. मॅन ऑफ द सिरीज म्हणत पंतने बुमराहला केक भरवला. यानंतर पंतने जडेजाला पकडलं आणि म्हणाला, “जड्डू भाईला हॅपी रिटायरमेंट, एक वर्ष झालं.” तितक्यात मागून बुमराह आणि सिराजनेही हॅपी रिटायरमेंट म्हटलं. हे ऐकून जडेजा म्हणाला, “एकाच फॉरमॅटमधून रिटायरमेंट घेतली आहे.” हे ऐकून सगळेच एकदम हसू लागले.
भारताने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर सर्वात आधी विराट कोहलीने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर रोहित शर्मा आणि मग रवींद्र जडेजाने टी-२० क्रिकेटला अलविदा केलं. भारताच्या वर्ल्डकप विजयाच्या वर्षपूर्तीसह या तिन्ही खेळाडूंच्या टी-२० निवृत्तीलाही एक वर्ष पूर्ण झालं आहे.