वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर तब्बल ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेपाठोपाठ भारतीय संघाने पाकिस्तानला नमवत वर्चस्व सिद्ध केलं. कीटकांच्या प्रादुर्भावामुळे खंडित झालेल्या सामन्यात भारताने २४७ धावांची मजल मारली. पाकिस्तानला हे लक्ष्य पेलवलं नाही आणि त्यांचा डाव १५९ धावांतच आटोपला. ३ मेडनसह २० धावांत ३ विकेट्स पटकावणाऱ्या क्रांती गौडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. पावसामुळे कोलंबोतल्या आर.प्रेमदासा स्टेडियमवरची खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली होती. चेंडू बॅटवर नीट येत नव्हता. अपेक्षित वेगाने बाऊंड्रीपर्यंत पोहोचतही नव्हता पण या अडथळ्यांना पार करत भारतीय संघाने विजय साकारला. भारतीय संघाने विजय कसा साकारला जाणून घेऊया.

१. छोट्या पण उपयुक्त खेळी

भारतीय फलंदाजांपैकी एकीलाही अर्धशतक करता आलं नाही. खेळपट्टी संथ होती. चेंडू बॅटवर नीट येत नव्हता. यामुळे मोठी खेळी साकारणं अवघड होतं. पण भारतीय फलंदाजांनी छोट्या पण उपयुक्त खेळी केल्या. ८ भारतीय फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठत संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली.

२. गोलंदाजांचं एकीचं बळ

भारताच्या गोलंदाजांनी एकीचं बळ दाखवत शिस्तबद्ध मारा केला. विकेट्स पटकावणं आणि धावा रोखणं या दोन्ही आघाड्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. क्रांती गौडने १० षटकात ३ मेडनसह अवघ्या २० धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स घेतल्या. रेणुका सिंगला विकेट मिळाली नाही पण तिनेही १० षटकात केवळ २९ धावा देत पाकिस्तानला डावाला वेसण घातली.

३. दीप्ती शर्माचं प्रसंगावधान

क्रिकेटच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत चेंडू डेड होत नाही, तोपर्यंत फलंदाजाने क्रीजच्याआतमध्ये राहणं गरजेचं असतं. याशिवाय भारताने जर रिव्ह्यू घेतला असता तर मुनीबा सुरूवातीला पायचीत देखील झाली होती. याचाच अर्थ मुनीबा एकाच चेंडूवर दोन वेळा बाद झाली.क्रांती गौडच्या चौथ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर संघाने पायचीत झाल्याचं अपील केलं. पण चेंडू लेग स्टंपच्या बाहेर तर नाही ना पिच झाला, अशी शंका होती. ऋचाने मात्र बाद असल्याची खात्री दाखवली तरी भारताने रिव्ह्यू घेतला नाही.क्रांतीचा तो चेंडू विकेटच्या मागे गेला आणि दीप्ती शर्माने चेंडू पकडत लगेच स्ट्रायकर एन्डच्या दिशेने थ्रो केला. तेव्हा मुनीबा क्रीजच्या बाहेर होती आणि तिचं लक्ष नव्हतं. दीप्ती शर्माचा थ्रो येऊन सरळ विकेटवर बसला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी अपील केलं, पण मैदानावरील पंचांनी नाबाद दिलं व तिसऱ्या पंचांची मदत घेतली. रिप्लेमध्ये मुनीबाने बॅट क्रीजच्या आत नेली आणि पुन्हा वर उचलेली दिसली. रनआउट तपासताना लक्षात आलं की चेंडू स्टंपला लागला तेव्हा बॅट हवेत होती आणि शेवटी आउट दिलं गेलं.दीप्तीच्या प्रसंगावधानामुळे भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळाली.

४. दर्जेदार क्षेत्ररक्षण

भारतीय संघाने २४७ धावांची मजल मारली. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने अफलातून आणि दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा वस्तुपाठ सादर केला. रनआऊट्स असो किंवा कॅचेस- भारतीय संघाने वर्ल्डकपसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. डियाना बेगला रनआऊट करण्यासाठी हरमनप्रीतने केलेला थ्रो आवर्जून पाहण्यासारखा होता. भारतीय क्षेत्ररक्षकांनी ७ झेल टिपले.

५. कीटक प्रकरणाचा नाही होऊ दिला परिणाम

कोलंबोत गेले काही दिवस चांगलाच पाऊस झाला आहे. कृत्रिम प्रकाशाच्या दिशेने प्रचंड कीटक मैदानात दाखल झाले. कीटक खूप प्रमाणावर असल्यामुळे सामना थांबवावा लागला. रसायन फवारणीनंतर कीटकांची संख्या कमी झाली. म्हणून सामना सुरू करण्यात आला. पण तरीही मैदानात कीटक होते. कॅमेऱ्याच्या झोतामध्ये कीटकांचे पुंजके सातत्याने दिसत होते. चेंडू टिपताना, धाव घेताना कीटक अडथळा ठरू शकतात पण भारतीय फलंदाजांनी कीटकांचा आपल्या एकाग्रतेवर परिणाम होऊ दिला नाही.