डरबन : भारतीय संघाच्या बहुचर्चित दक्षिण आफ्रिका दौऱ्याला आज, रविवारपासून ट्वेन्टी-२० मालिकेने सुरुवात होणार असून पहिला सामना डरबनच्या किंग्जमिड मैदानावर खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंचा कस लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जायंबदी असल्याने ट्वेन्टी-२० संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पंडया या संपूर्ण दौऱ्याला मुकणार आहे. तसेच प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित फलंदाजांच्या ट्वेन्टी-२० संघातील भविष्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंची मोट बांधण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर ४-१ अशी सहज मात केली होती. मात्र, ही मालिका मायदेशात झाली होती. आता दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या मैदानांवर पराभूत करण्याचे भारतीय संघासमोर आव्हान आहे.

हेही वाचा >>> ट्वेन्टी-२० विश्वचषकाला अवकाश, रोहितबाबतच्या निर्णयाची घाई का? ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांचे वक्तव्य

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात झालेल्या मालिकेतील खेळपट्टया पूर्णपणे फलंदाजीला अनुकूल होत्या. आफ्रिकेतील खेळपट्टयांकडून मात्र वेगवान गोलंदाजांना मदत मिळणे अपेक्षित आहे. अधिक उसळी असणाऱ्या या खेळपट्टयांवर भारताच्या युवा फलंदाजांची कसोटी लागेल. त्याच वेळी भारताच्या वेगवान गोलंदाजांसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची ही उत्तम संधी असेल. दोन्ही संघांनी आपल्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे या मालिकेत दमदार कामगिरी करून पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी भक्कम करण्याचा युवा खेळाडूंना प्रयत्न असेल.

सूर्यकुमार, श्रेयसवर भिस्त

ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या सूर्यकुमारवर भारताची भिस्त असेल. सूर्यकुमारने यापूर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांत शतके साकारली आहेत. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टयांवर धावा करण्याची कला त्याला अवगत आहे. त्याला मुंबईकर सहकारी श्रेयस अय्यरची साथ मिळणे गरजेचे आहे. विश्वचषकानंतर विश्रांती देण्यात आलेल्या शुभमन गिलचेही ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाल्याने भारतासमोर आघाडीच्या फळीचा पेच निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र, गिल संघात परतल्याने या दोघांपैकी एकाला संघाबाहेर राहावे लागू शकेल. तसेच यष्टिरक्षक म्हणून इशान किशन आणि जितेश शर्मा यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात डावखुरा अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार या वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली होती. विशेषत: अर्शदीपने अखेरच्या षटकात १० धावा वाचवल्या होत्या. आता हे दोघे कामगिरीत सातत्य राखतात का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टिरक्षक), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

दक्षिण आफ्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), रीझा हेन्ड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झकी, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासन (यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स (यष्टिरक्षक), ओटनील बार्टमन, नान्ड्रे बर्गर, जेराल्ड कोएट्झी, डोनोव्हन फरेरा, मार्को यान्सन, केशव महाराज, लुन्गी एन्गिडी, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, लिझाड विल्यम्स.

* वेळ : रात्री ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian team to play first t20 match against host south africa zws