मे महिन्यात खेळवण्यात आलेल्या इंडियन प्रिमियर लिगचा उर्वरित हंगाम करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्यानंतर रविवारपासून या उरलेल्या ३१ सामन्यांचा आयपीएलचा दुसरा हंगाम सुरु झाला. पहिल्याच सामन्यामध्ये याच पर्वातील पूर्वाधामध्ये मुंबई इंडियन्सकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढत चेन्नई सुपर किंग्जने दुबईच्या मैदानात २० धावांनी विजय मिळवत दुसऱ्या पर्वाचा श्रीगणेशा केलाय. पहिल्या पाच षटकांमध्ये २४ वर चार गडी बाद या स्थितीमधून थेट २० धावांनी सामना जिंकत चेन्नईने आपणच कमबॅकचे किंग्स असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं. सामन्यातील या कमबॅकसोबतच चेन्नईने मालिकेतील गुणतालिकेमध्येही दमदार पुनरागमन करत थेट पहिल्या स्थानी झेप घेतलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाणेफेक जिंकलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईविरोधात २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. चेन्नईचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने नाबाद ८८ धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. मुंबईकडून सौरभ तिवारीने नाबाद ५० धावांची खेळी केली, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत १२ गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे. सध्या गुणतालिकेमध्ये आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवत १.२२३ च्या रनरेटने चेन्नईचा संघ पहिल्या स्थानी आहे.

दिल्लीनेही आठपैकी सहा सामने जिंकले असले तरी तरी त्यांचा रनरेट ०.५४७ इतका असल्याने ते दुसऱ्या स्थानी आहेत. तिसऱ्या स्थानी सात सामन्यांपैकी पाच सामने जिंकणारा विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आहे. मुंबईच्या संघाने पराभवानंतरही आपलं चौथ्या क्रमांकावरील स्थान कायम राखलं आहे. मुंबईने आठपैकी चार सामने जिंकलेत तर चार गमावले आहेत. राजस्थान रॉयल्सने सातपैकी तीन सामने जिंकलेत तर पंजाबला आठपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवता आलाय. हे संघ अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत. सातव्या स्थानी दोन विजयांसहीत कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आहे तर आठव्या स्थानी एका विजयासहीत सनराईजर्स हैदराबादचा संघ आहे.


स्पर्धा अचानक स्थगित करण्यात आली तेव्हा दिल्लीचा संघ पहिल्या स्थानी तर चेन्नई दुसऱ्या स्थानी होता. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यानंतर केवळ अव्वल दोन संघांचे स्थान बदलले असून बाकी पॉइण्ट टेबल आहे तसाच आहे.

चेन्नईने कशी खेळी केली?

चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी दिली. मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिल्ने यांनी तिखट मारा करत चेन्नईची पहिल्या पॉवरप्लेमध्ये अवस्था ४ बाद २४ अशी केली. डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ऋतुराज आणि रवींद्र जडेजा यांनी भागीदारी रचत चेन्नईच्या डावाला आकार दिला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर ऋतुराजने आक्रमक फटके खेळायला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने जडेजाला झेलबाद करत ही भागीदारी तोडली. गायकवाड-जडेजा यांनी ८१ धावांची भागीदारी केली, जडेजाने २६ धावा केल्या. त्याच्यानंतर ड्वेन ब्राव्हो फलंदाजीसाठी मैदानात आला. ७ चेंडूत २३ धावांची खेळी करून ब्राव्हो शेवटच्या षटकात झेलबाद झाला. त्याने ३ षटकार ठोकले. ऋतुराजने ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८८ धावा ठोकत चेन्नईला २० षटकात ६ बाद १५६ धावा अशी धावसंख्या गाठून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ५६ धावा केल्या. ऋतुराजने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले.

मुंबईच्या डावात काय घडलं?

मुंबईकडून पदार्पणवीर अनमोलप्रीत सिंग आणि  क्विंटन डी कॉक यांनी सलामी दिली. आक्रमक सुरुवात केलेल्या क्विंटन डी कॉकला दीपक चहरने पायचित पकडले. डी कॉकने १७ धावा केल्या. दीपक चहरने सुंदर फटके खेळलेल्या अनमोलप्रीतची दांडी गुल करत त्याला तंबूचा मार्ग दाखवला, अनमोलने १६ धावा केल्या.  सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्या हे स्टार फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. सौरभ तिवारीने ५ चौकारांसह नाबाद ५० धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. चेन्नईचा अनुभवी गोलंदाज ड्वेन ब्राव्होने २५ धावांत ३ बळी घेत मुंबईच्या डावाला सुरूंग लावला. दीपक चहरने २ बळी घेत ब्राव्होला उत्तम साथ दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 csk vs mi chennai beat mumbai by 20 runs go top of the table scsg