RCB vs GT IPL 2023 Match Weather Report : आयपीएल २०२३ मधील ७० वा सामना शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. साखळी फेऱीतला हा शेवटचा सामना आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना सुरू होईल. हा सामना गुजरात संघासाठी फार महत्त्वाचा नाही. कारण या संघाने गुणतालिकेत पहिल्या स्थानासह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. परंतु हा सामना फाफ डु प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आरसीबीला त्यांचा हा शेवटचा सामना जिंकणं आवश्यक आहे.
आरसीबीसाठी आजचा सामना निर्णायक असला तरी पाऊस त्यांच्या कथेतला खलनायक ठरू शकतो. कारण सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. Weather.com नुसार, बंगळुरू विरुद्ध गुजरात सामन्यात पावसाची ६० टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. सामन्याच्या नियोजित वेळेत पावसाची ७० टक्के शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन तासांत पावसाची ५८ ते ६३ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सामन्यादरम्यान तापमान २३ अंश सेल्सिअस ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत असू शकतं.
हे ही वाचा >> IPL2023: जेव्हा कॅप्टन कूलला राग येतो…, live मॅचमध्ये चेंडू बदलण्यावरून अंपायरशी बाचाबाची; पाहा Video
या सर्व शक्यतांनी आरसीबीच्या गोटात चिंता निर्माण केल्या आहेत. अशातच बँगलोर संघाच्या चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमजवळच्या हॉटेलच्या गॅलरीतून आकाशने एक व्हिडीओ चित्रीत केला आहे. यात बंगळुरूमध्ये पाऊस सुरू झाल्याचं दिसतंय. तसेच आकाशने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “बंगळुरूत पाऊस पडतोय”. हा व्हिडीओ पाहून आरसीबीच्या चाहत्यांच्या चिंता वाढल्या आहेत.