नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १७व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येऊ शकतील अशी चर्चा सुरू होती. मात्र, ‘आयपीएल’चे अध्यक्ष अरुण धुमल यांनी या चर्चाना पूर्णविराम देताना संपूर्ण स्पर्धा भारतातच होणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केले.
विश्वातील सर्वात लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धा अशा ख्याती असलेल्या ‘आयपीएल’च्या आगामी हंगामाला २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. सलामीच्या लढतीत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर विराट कोहलीचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान असेल. ‘बीसीसीआय’ने काही दिवसांपूर्वीच ‘आयपीएल’च्या आगामी हंगामातील पहिल्या केवळ १७ दिवसांचेच वेळापत्रक जाहीर केले होते.
उर्वरित वेळापत्रक हे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निश्चित केले जाईल, असे त्यावेळी ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी घोषणा केली. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत ५४३ लोकसभा मतदारसंघांसाठी ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. ‘बीसीसीआय’ने यापूर्वीच २२ मार्च ते ७ एप्रिल या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
हेही वाचा >>> WPL 2024 Final : दिल्ली की बंगळूरुची जेतेपदाची प्रतीक्षा संपणार? ‘डब्ल्यूपीएल’चा अंतिम सामना आज
या कालावधीत २१ सामने खेळवले जाणार आहेत. यानंतरचे सामनेही भारतातच होणार असल्याची माहिती अरुण धुमल यांच्याकडून शनिवारी देण्यात आली.
‘‘आम्ही लवकरच उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करू. ‘आयपीएल’ भारताबाहेर हलविण्यात येणार नाही हे नक्की,’’ असे धुमल यांनी सांगितले. तसेच ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनीही यापूर्वी लोकसभा निवडणुकांचा ‘आयपीएल’ आयोजनावर परिणाम होणार नसल्याचे नमूद केले होते.
काही ‘आयपीएल’ संघांनी आपल्या खेळाडूंना त्यांचे पारपत्र आपल्याकडे सूपूर्द करण्याची सूचना केल्याची माहिती देण्यात येत होती. त्यामुळे यंदा दुसऱ्या टप्प्यातील सामने भारताबाहेर होऊ शकतील अशी चर्चा सुरू झाली होती. यापूर्वी करोना प्रादुर्भावाच्या कारणास्तव २०२०मध्ये पूर्ण स्पर्धा आणि २०२१मध्ये ‘आयपीएल’चे दुसऱ्या टप्प्यातील सामने अमिरातीत खेळवण्यात आले होते. त्यामुळे यंदाही अमिराती किंवा केवळ दुबईचा विचार केला जाऊ शकेल असे म्हटले जात होते. मात्र, धुमल यांनी या चर्चाना पूर्णविराम दिला.
लोकसभा निवडणुकांचा यापूर्वी झालेला परिणाम..
लोकसभा निवडणुकांचा ‘आयपीएल’वर परिणाम झाल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले होते. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या कारणास्तव ‘आयपीएल’चा संपूर्ण हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. ‘आयपीएल’ भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर २०१४मध्ये निवडणुकांमुळेच सुरुवातीच्या २० सामन्यांचे आयोजन अमिरातीत करण्यात आले होते. २०१९मध्ये मात्र लोकसभा निवडणुका असतानाही संपूर्ण ‘आयपीएल’ स्पर्धा भारतातच झाली होती. यंदाही सर्व सामने भारतात होणार असल्याचे धुमल यांनी सांगितले आहे.